खासबाग घटनेसाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

खासबाग घटनेसाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
अपुऱ्या स्वच्छतागृहांमुळे ही घटना घडल्याचा आप महिला आघाडीचा आरोप

रोहन भिऊंगडे / प्रतिनिधी  

कोल्हापुरात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे जुन्या वास्तू धोकादायक बनल्या आहेत. हेरिटेज वास्तूंच्या देखभालीसाठी निधी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. हरिटेज वास्तू फक्त कागदावर आहेत. अशा परिस्थितीत स्वच्छतागृहाच्या पाळीत वेळ लागणार असल्यामुळे खासबाग येथील अडगळीत लघुशंकेसाठी गेलेल्या दोन महिला भिंत कोसळून ढिगाऱ्याखाली अडकल्या. या दुर्घटनेत अश्विनी यादव या महिलेचा अंत झाला. हा अपघाती मृत्यू नसून महापालिका अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे झालेला अपराध आहे.

खासबाग शेजारी असणाऱ्या स्वच्छतागृहाची दुरुस्ती वेळेत झाली असती व परिसरात पुरेशी स्वच्छतागृहे असती तर कदाचित ही घटना घडली नसती. गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून आप महिला आघाडीच्या वतीने शहरात पुरेशी स्वच्छतागृहे  बांधण्यात यावीत यासाठी पाठपुरावा सुरु आहे. अनेक निवेदने, बैठका होऊनही महापालिका अधिकारी फक्त टोलवाटोलवी करतात. हेरिटेज वास्तूंची देखभाल दुरुस्ती करणे ही सुद्धा जबाबदारी महापालिकेची आहे.

या दोन्ही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळेच खासबाग येथील घटना घडली. त्यामुळे, या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा अशी मागणी आप च्या महिला आघाडी शहराध्यक्षा अमरजा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. हेरिटेज वास्तूंच्या संवर्धनासाठी महापालिकेने चालढकल करू नये, अन्यथा अधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी दिला.

यावेळी महिला संघटिका पूजा अडदांडे, उषा वडर, पल्लवी पाटील, स्मिता चौगुले, आशा सोनावणे, सुनंदा मोहिते, सुनीता तांदळे, उत्तम पाटील, अभिजित कांबळे आदी उपस्थित होते.