गिरीश फोंडे यांच्या निलंबनाविरोधात गुरुवारी राज्यव्यापी आंदोलन ..!

कोल्हापूर - शक्तीपीठ महामार्ग विरोधात गेल्या एक वर्षापासून आंदोलन सुरु असून आंदोलनास नैतिक समर्थन देणारे सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक गिरीश फोंडे यांच्यावर प्रशासनाने निलंबनाची चुकीची कारवाई केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.
याविरोधात उद्या कोल्हापूर शहरात मूक मोर्चाही काढण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता भवानी मंडप ते महानगरपालिका असा मूक मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चामध्ये इंडिया आघाडी, शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, शिक्षक संघटना समन्वय समिती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, दारूबंदी संघर्ष समिती, सामाजिक संघटना कृती समिती,विद्यार्थी संघटना कृती समिती यांच्यासह सामान्य नागरिक रस्त्यावरती उतरून सनदशीर मार्गाने विरोध नोंदवणार आहेत.
या मोर्चात आमदार जयंत आसगावकर, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार संपतबापू पवार पाटील, सरोज पाटील, विजय देवणे, एस.डी लाड, सचिन चव्हाण, आर. के. पवार यांच्यासह अनेक नेते सहभागी होणार आहेत. महायुती सरकारच्या आदेशावर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त के मंजूलक्ष्मी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात 5 एप्रिल रोजी होणाऱ्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रक्षोभक वक्तव्य केले असा आरोप ठेवून गिरीश फोंडे यांना ३ एप्रिल रोजी तडकाफडकी निलंबित केले.
त्याचबरोबर ५ एप्रिल च्या दौऱ्या अगोदर दोन दिवस शेतकऱ्यांची धर पकड करत त्यांना पोलीस कस्टडीमध्ये ठेवले या विरोधात राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सामान्य नागरिकांनी देखील सहभागी होण्याची आवाहन संयोजकांनी केले आहे. ही कारवाई तर सुरुवात आहे ही कारवाई पचल्यास इथून पुढे अनेक सामाजिक समस्यांवर नागरिकांनी आपले मत व्यक्त करायची की नाही असा प्रश्न निर्माण होईल. जन सुरक्षा विधेयक महाराष्ट्र सरकार अनु पाहत आहे त्यामध्ये अशीच मुस्कटदाबी लोकांची होणार आहे. त्यामुळे काळाची पावले ओळखून लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.