गृहमंत्रीपद सोडा,भाजपाची शिंदेंना 'ही' ऑफर

गृहमंत्रीपद सोडा,भाजपाची शिंदेंना 'ही' ऑफर

मुंबई: विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला. यानंतर महायुतीचे सरकार स्थापन होणार हे नक्की झालं. पण अद्यापही सरकार स्थापन झालेलं नाही.  आता उद्या म्हणजेच  ५ डिसेंबरला मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. ऐतिहासीक आझाद मैदानात हा शपथविधी पार पडणार असून भाजपाच्या वतीने या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. 

भाजपच्या विधिमंडळाची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. तर पंकजा मुंडे, दरेकर, चव्हाण यांनी याला अनुमोदन दिले. 

शपथविधीला अवघे काही तास शिल्लक असल्याने राज्यात राजकीय घडामोडींना मोठा वेग आलेला दिसत आहे. यादरम्यान, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडली. फडणवीसांनी थेट वर्षा बंगला गाठत शिंदेंची भेट घेतली. पाऊण तास या दोन नेत्यांमध्ये बैठक झाली. त्यानंतर राज्याचं गृहखातं हे फडणवीसांकडेच राहणार हे ठरल्याचं सूत्रांच्या माहितीने समोर आलं आहे.

गृहमंत्रिपद हे फडणवीसांकडे राहावं अशी भाजपची इच्छा आहे. त्याबदल्यात शिंदेंना उपमुख्यमंत्रिपद आणि त्यासह नगरविकास खातं आणि आणखी एक खात्याची ऑफर दिल्याची सूत्रांची माहिती आहे. तसा प्रस्ताव एकनाथ शिंदेंपुढे ठेवण्यात आला आहे. शपथविधी सोहळा आता काही तासांवर आला आहे. त्यामुळे आज मंत्रिपदाच्या तिढ्यावर आज निर्णय होणे अपेक्षित आहे. 

शपथविधी सोहळ्याला देशभरातील नेत्यांना निमंत्रण 

उद्या ५ डिसेंबरला महायुती सरकारच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावरील तयारी अखेरच्या टप्प्यात आहे. या शपथविधी सोडळ्यासाठी देशातील अनेक बड्या नेत्यांना आमंत्रण पाठवण्यात आलं आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनाही आमंत्रण देण्यात आलं आहे. त्याशिवाय, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, नितीशकुमार, प्रमोद सावंत, भूपेंद्र पटेल यांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे.