गोकुळ तर्फे १० वी १२ वी गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त कर्मचा-यांचा सत्कार
कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापुर जिल्हा सहकारी दूध उत्पादक कर्मचारी संघटने संचलित कॉम्रेड अवि पानसरे प्रतिष्ठान व संघ व्यवस्थापक यांच्या संयुक्त विद्यमानाने सालाबादप्रमाणे सन-२०२४ च्या सेवानिवृत्त कर्मचारी व १० वी १२ वी मध्ये प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील प्रमुख उपस्थितीत संघाच्या प्रधान कार्यालय गोकुळ शिरगाव येथील कुरियन हॉल येथे दि.२९/०६/२०२४ इ.रोजी संपन्न झाला. सदर कार्यक्रमाला लोकशाहीर विद्रोही संभाजी भगत व संघटनेच्या मेघा पानसरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विद्रोही शाहीर संभाजी भगत म्हणाले कि, महाराष्ट्रामध्ये सहकारी क्षेत्र कमी होण्याच्या मार्गावर असताना गोकुळ दूध संघाने आपल्या आदर्श व्यवस्थापनाने सहकाराच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायमध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे. त्यामुळेच गोकुळ दूध संघ हा सहकारातील आदर्श संघ म्हणून ओळखला जात असून गोकुळने आपल्या विविध योजना राबवून जिल्ह्यातील पशुधन वाढवण्यासाठी मोठे योगदान दिले आहे असे मनोगत व्यक्त केले व कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरचे आयुष्य चांगल्या पद्धतीने कसे व्यतीत करता येईल याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की, आजचे यशस्वी विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे उज्वल भविष्य असून त्यांनी जबाबदार नागरिक बनणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी, वैद्यकीय या विद्याशाखाव्यतिरिक्त इतरही शाखांचा करिअरसाठी विचार करावा. याचबरोबर पालकांनी विद्यार्थ्यावर आपले मत न लादता त्यांना त्यांच्या आवडीचे क्षेत्र निवडू द्यावे असे मनोगत व्यक्त केले व सेवानिवृत्त कर्मचारी यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे स्वागत प्रस्थाविक गोकुळ संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ.सदाशिव निकम यांनी केले, तर आभार कॉ.संदेश पाटील (गुरव) यांनी मानले.
यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, विद्रोही शाहीर संभाजी भगत, मेघा पानसरे, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कॉ.मल्हार पाटील, जनरल सेक्रेटरी कॉ.सदाशिव निकम, संघटनेचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.