रोटरीच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवणार - अरुंधती महाडिक
कोल्हापूर (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन या संस्थेने सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. या वर्षात क्लबच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातील. पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे. प्रत्येकाने किमान एक रोपटे लावून त्याचे संवर्धन करावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या नुतन अध्यक्षा अरूंधती महाडिक यांनी केले. विकासवाडी आणि कागल पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीमध्ये आज वृक्षारोपण करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी अरूंधती महाडिक यांची निवड करण्यात आलीय. या क्लबचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्ताने वृक्षारोपण करून, नव्या वर्षातील सामाजिक उपक्रमांचा श्रीगणेशा करण्यात आला. अरूंधती महाडिक, उपाध्यक्षा डॉ. मिरा कुलकर्णी, सचिव बी. एस. शिंपुकडे, खजानिस अनिरूध्द तगारे यांच्या हस्ते विकासवाडी परिसरात विविध देशी वृक्षांची रोपे लावण्यात आली. संपूर्ण जगभर रोटरी चळवळीकडून सामाजिक आणि लोकोपयोगी उपक्रम आखले जातात. सुवर्ण महात्सवी वर्षात पदार्पण केलेल्या रोटरी क्लब मिड टाऊन कडून वर्षभरात अभिनव सामाजिक उपक्रम राबवले जातील. विशेषतः पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातील. प्रत्येक व्यक्तीनं किमान एक रोप लावून, त्याचे संवर्धन करावे, असे आवाहनही सौ. महाडिक यांनी केले. यावेळी बी. एस. शिंपुकडे, करूणाकर नायक, दिपक मिरजे, डॉ. रमेश खटाबर यांनीही मनोगत व्यक्त केले. तर रोटरीच्या सर्व सदस्यांना झाडांची रोपं भेट देण्यात आली. यावेळी विकासवाडी आणि कागल पंचतारांकीत औद्योगिक वसाहत परिसरात शंभर पेक्षा अधिक रोपांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाला शरद पाटील, रितू वायचळ, भारती नायक, राज शेख, सचिन लाड, जगदीश चव्हाण, राजू घोरपडे यांच्यासह रोटरॅक्टच्या अध्यक्षा प्रेरणा जाधव, सचिव अनुष्का शिंदे, उपसची व श्री पटेल आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनचे सदस्य उपस्थित होते.