घरफाळा रिव्हिजनचे काम त्वरित सुरू करा घरफाळा विभागाच्या बैठकीत 'आप'ची मागणी

घरफाळा रिव्हिजनचे काम त्वरित सुरू करा  घरफाळा विभागाच्या बैठकीत 'आप'ची मागणी

महापालिकेच्या घरफाळा विभागाने शहरातील मिळकतींचे रिव्हिजन करण्याचा निर्णय घेतला आहे. गेले अनेक वर्षे प्रलंबित आहे. त्यामुळे वापरात बदल केलेल्या किंवा वाढीव बांधकाम केलेल्या मिळकतींना कर पात्र करणे शक्य झालेले नाही. परिणामी महापालिकेच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होत आहे. शहरातील मिळकतीचे रिव्हिजन करण्यासाठी यावर्षीच्या बजेटमध्ये तरतूद देखील करण्यात आलेली आहे. त्यामुळे रिव्हिजनचे काम त्वरित सुरू करावे अशी मागणी 'आप'चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी घरफाळा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेली बैठकीत केली. 

घरफाळा विभागाचे स्पेशल ऑडिट करावे ही मागणी 'आप'ने लावून धरली आहे. स्पेशल ऑडिटबाबत काय पाठपुरावा केला असा सवाल 'आप' पदाधिकाऱ्यांनी केला. यावर नगरविकास खात्याकडे पत्रव्यवहार सुरू असल्याचे कर निर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड यांनी सांगितले. 

शासकीय थकबाकीदारांच्या वसुलीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संबंधित विभागांची बैठक लावावी, खाजगी थकबाकीदारांची न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये वसुली कशापद्धतीने करता येईल यावर प्लॅन आखावा, घरफाळा विभागातील रिक्त जागा भरण्यासाठी पाठपुरावा करावा अशा मागण्या 'आप'ने बैठकीत केल्या.

यावेळी 'आप'चे जिल्हा युवाध्यक्ष उत्तम पाटील, घरफाळा अधीक्षक विजय वणकुद्रे, अच्युत अडुळकर, संजय अतिग्रे, बाबा साळोखे आदी उपस्थित होते.