जिल्ह्यात 1 ते 15 जुलै दरम्यान शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत बालकांची शोधमोहीम

जिल्ह्यात 1 ते 15 जुलै दरम्यान शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत बालकांची शोधमोहीम

कोल्हापूर (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिनांक 1 ते 15 जुलै या कालावधीत विशेष शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत 3 ते 18 वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, शिक्षण हक्क अधिनियम 2009 नुसार 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकास मोफत व सक्तीचे शिक्षण घेण्याचा हक्क प्राप्त झाला आहे.

या अनुषंगाने शाळेत कधीच प्रवेश न घेतलेली, प्राथमिक शिक्षण अपूर्ण असलेली, एक महिन्यापेक्षा अधिक काळ अनुपस्थित असलेली तसेच स्थलांतरित कुटुंबांतील बालकांची घरोघरी, बसस्थानक, रेल्वेस्थानक, बाजारपेठा, वीटभट्ट्या, दगडखाणी, साखर कारखाने, बालमजुरीच्या ठिकाणी व बालगृह, निरीक्षणगृह, विशेष दत्तक संस्था याठिकाणी माहिती संकलित केली जाणार आहे.

या उपक्रमामध्ये महसूल, ग्रामविकास, नगर विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महिला व बालविकास, कामगार विभाग, आदिवासी विभाग, सार्वजनिक आरोग्य व गृह विभाग यांचा समन्वयाने सहभाग राहणार आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मदतीने ही शोधमोहीम राबविली जाणार असून गावपातळीवरील समिती अंतर्गत सेवाज्येष्ठ मुख्याध्यापक सर्वेक्षणाचे नेतृत्व करणार आहेत. केंद्रप्रमुख व अंगणवाडी पर्यवेक्षिका हे सर्वेक्षणाचे पर्यवेक्षण करतील.

सर्वेक्षणासाठी शासन स्तरावर स्तरनिहाय नोडल अधिकारी नेमण्यात आले असून, जिल्हा स्तरावर 3 ते 6 वयोगटासाठी महिला व बालविकास अधिकारी, 6 ते 14 वयोगटासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी व 14 ते 18 वयोगटासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. तालुका स्तरावर बाल विकास प्रकल्प अधिकारी व गटशिक्षणाधिकारी हे अनुक्रमे 3 ते 6 व 6 ते 18 वयोगटाच्या सर्वेक्षणासाठी जबाबदार असतील, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी दिली आहे.