ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे यांचं निधन

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे यांचं निधन झालं. माहीम इथल्या राहत्या घरी गुरुवारी रात्री १०च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात त्यांच्या कन्या आहेत. रात्री उशिरा दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत प्रेमा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गेल्या अनेक दशकांपासून चित्रपटसृष्टीत त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. हिज मास्टर्स व्हॉइस या ध्वनिमुद्रिका बनविणाऱ्या कंपनीत ध्वनिमुद्रक असलेल्या वसंतराव कामेरकर यांच्या त्या कन्या होत्या. मुंबईच्या शारदा सदनमधून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झालेल्या प्रेमा साखरदांडे यांनी शालेय रंगभूमी हे पुस्तक लिहिलं आहे.

प्रेमा साखरदांडे यांना दहा भावंडे होती. त्यांच्या भगिनी ज्योत्स्ना कार्येकर, सुलभा देशपांडे आणि आशा दंडवते याही अभिनयक्षेत्रात होत्या. बंधू बापू, अशोक, विश्वनाथ, मुकुंद यांनीही रंगभूमी, चित्रपट, आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात काम केलं आहे. भगिनी कुमुद या गायिका आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये गाण्याचे कार्यक्रम केले होते. अशोक कामेरकरांनी अमेरिकेत दुर्गा झाली गौरी या नाटकाचे प्रयोग केले.

प्रपंच मालिकेतील भूमिका गाजली 

साखरदांडे यांनी चित्रपट, दूरचित्रवाणी मालिकांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. तसंच काही वर्षांपूर्वी टीव्हीवर गाजलेल्या प्रपंच मालिकेतही प्रेमा यांनी साकारलेली आजीची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली. आजही मालिका, सिनेमा, चित्रपटातील आजीचा चेहरा म्हणून त्यांचाच चेहरा समोर येतो.