शक्तिपीठ महामार्गावरील मंदिरांच्या विकासासाठी ५-५ हजार कोटींचा निधी द्या : आ. सतेज पाटील

शक्तिपीठ महामार्गावरील मंदिरांच्या विकासासाठी ५-५ हजार कोटींचा निधी द्या : आ. सतेज पाटील

मुंबई: महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सतेज पाटील यांनी नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गावरील मंदिरांच्या विकासासाठी ५-५ हजार कोटींचा  निधी द्या अशी मागणी केली. राज्यपालांच्या अभिभाषणातील या महामार्गावरील निर्णयावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारने मंदिरांचा विकास करावा, अशी मागणीही यावेळी पाटील यांनी केली. 

यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना सतेज पाटील म्हणाले की, सरकार विकासाच्या नावाखाली केवळ महसुली उत्पन्न वाढवण्यावर भर देत आहे. महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होत असूनही, टोलविषयक अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. त्यांनी उदाहरण देत सांगितले की, टोल वसुलीवरून ८६ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत, मात्र महामार्गावरील टोलमुळे वाहनधारकांना ३ हजार कोटींचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे.

शक्तिपीठ मार्गावर असलेल्या मंदिरांमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा पुरवण्याचा सरकारचा हेतू असायला हवा. मंदिरांच्या विकासासाठी ५-५ हजार कोटींच्या निधीची तरतूद केली तर यात्रेकरूंना अधिक चांगल्या सुविधा मिळतील आणि धार्मिक पर्यटनालाही चालना मिळेल, असेही पाटील यावेळी म्हणाले.