'एकच प्याला'तील "तळीराम" कालवश..!
कोल्हापूर / माझा महाराष्ट्र प्रतिनिधी :
गेल्या चार दशकांहून अधिक काळ सिनेसृष्टीत नाटक, सिनेमा, मालिका आणि ओटीटी या विविध प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते आणि रंगकर्मी जयंत सावरकर यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
आपल्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी जयंत सावरकर यांची ओळख होती. त्यांच्या कारकिर्दीतील एकच प्याला या नाटकातील त्यांनी साकारलेले तळीराम हे पात्र फारच गाजले होते. सावरकर यांनी विनोदी, गंभीर भूमिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकली. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे मागील 15 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज त्यांची प्राणज्योत मावळली.
जयंत सावरकर यांचा जन्म 3 मे 1936 रोजी गुहागर येथे झाला. वयाच्या 20 व्या वर्षापासून त्यांनी अभिनयाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली होती. अपराध मीच केला (गोळे मास्तर), अपूर्णांक (ब्रम्हे),अलीबाबा चाळीस चोर (खुदाबक्ष),अल्लादीन जादूचा दिवा (हुजऱ्या), एकच प्याला (तळीराम) सारख्या मराठी नाटकात त्यांनी काम केलं. त्यांच्या या भूमिका मराठी प्रेक्षकांच्या मनात कायम घर करुन राहणार आहेत.
जयंत सावरकर यांचा मोठा भाऊ मुंबईत नोकरी करत होता. त्याच्याकडे जयंत सावरकर आले आणि गिरगावातच त्यांचं वास्तव्य दीर्घकाळ होतं. आपल्या कारकिर्दीची सुरुवातीची बारा वर्षे त्यांनी बॅक स्टेज आर्टिस्ट म्हणूनही काम केले. त्याचवेळी ते नोकरीही करत होते. मुंबई मराठी साहित्य संघात स्वयंसेवक आणि कार्यकर्ता म्हणूनही त्यांनी काम केलं. हौशी नाट्य संस्थांमधून त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. आचार्य अत्रे लिखित आणि पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित किंग लिअर या नाटकात मास्टर दत्ताराम यांच्यासह जयंत सावरकर यांना काम करण्याची संधी मिळाली. ९७ व्या नाट्य परिषदेचं अध्यक्षपदही जयंत सावरकर यांनी भुषवलं आहे.
जयंत सावरकर यांनी तीसपेक्षा जास्त हिंदी सिनेमांमध्येही कामं केली आहेत. जयंत सावरकर यांनी ‘अपराध मीच केला’, ‘अपूर्णांक’, ‘आम्ही जगतो बेफाम’, ‘एकच प्याला’, ‘लग्नाची बेडी’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘सूर्यास्त’, ‘सूर्याची पिल्ले’ अशा एकाहून एक गाजलेल्या नाटकांमध्ये काम केलं आहे. जयंत सावरकर हे गेल्या काही वर्षांपासून ठाण्यात वास्तव्य करत होते. त्यांच्या पार्थिवावर २५ जुलै अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मराठी सिनेविश्व, नाट्यविश्व आणि मालिका विश्वावर जयंत सावरकर यांच्या निधनाच्या बातमीने शोककळा पसरली आहे.