नानीची सलमानच्या विधानावर सडेतोड प्रतिक्रिया... म्हणाला, तो सुपरस्टार....

नानीची सलमानच्या विधानावर सडेतोड प्रतिक्रिया... म्हणाला, तो सुपरस्टार....

मुंबई : तेलुगू चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता नानीने बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या विधानावर थेट आणि स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत सलमान खानने असे सुचवले होते की, दक्षिणेकडील चित्रपट उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात पाहिले जातात, परंतु हिंदी चित्रपटांना दक्षिणेत तितकं महत्त्व दिलं जात नाही. यावर नानीने ‘डीएनए इंडिया’शी संवाद साधताना आपली भूमिका मांडली.

नानी म्हणाला, “हिंदी चित्रपट हे मूळ आहेत. दक्षिणेकडील चित्रपटांना अलीकडे प्रेम मिळू लागलं असलं तरी, आम्ही दक्षिणेत अनेक दशकांपासून हिंदी चित्रपट पाहत आलो आहोत. अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांचे सिनेमे आमच्या आठवणींचा भाग आहेत. 'कुछ कुछ होता है', 'दिल तो पागल है' हे चित्रपट इथे ब्लॉकबस्टर ठरले आहेत.”

सलमानच्या वक्तव्यावर थेट प्रत्युत्तर देताना नानी म्हणतो, “त्याचे सिनेमे चालत नाहीत? मग तो सुपरस्टार कसा झाला? त्याचे चित्रपट १००% चालतात. आम्ही त्याचे 'हम आपके है कौन'सारखे चित्रपट पाहिले आहेत. त्या चित्रपटातील गाणी तर आमच्या लग्नसमारंभांचाही भाग असतात.”

‘बिग बॉस तेलुगू’चे होस्ट म्हणून देखील ओळख असलेल्या नानीने स्पष्ट केलं की, देशभरात प्रेक्षक सर्व प्रकारच्या सिनेमांना स्वीकारत आहेत. त्यामुळे कोणत्याही इंडस्ट्रीवर आरोप करणं योग्य नाही.

दरम्यान, नानी सध्या ‘हिट – द थर्ड केस’ या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. शैलेश कोलानू दिग्दर्शित या सिनेमात त्याच्यासोबत KGF फेम श्रीनिधी शेट्टी, राव रमेश आणि ब्रह्माजी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.