डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात अर्जुन इनोव्हेशन, इन्क्युबेशन फाऊंडेशनची स्थापना

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात अर्जुन इनोव्हेशन, इन्क्युबेशन फाऊंडेशनची स्थापना

कोल्हापूर: डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये "डिवायपीसीईटी अर्जुन इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड एंटरप्रेन्योरशिप फाऊंडेशन" (DAIIEF) ची स्थापना करण्यात आली आहे.  नवीन उद्योजकांना मार्गदर्शन, व्यवस्थापन सल्ला, तसेच तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यांचा विकास साधण्यासाठी पाठबळ देण्याचे काम या फाऊंडेशनच्या माध्यमातून केले जाणार असल्याची माहिती डी. वाय. पाटील ग्रुपचे  कार्यकारी संचालक डॉ.अनिलकुमार गुप्ता यांनी दिली. 

महाराष्ट्र राज्य नवोपक्रम सोसायटी आणि भारत सरकारच्या कंपनी रजिस्ट्रार यांच्या मान्यतेने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. डिवायपीसीईटी अर्जुन फाऊंडेशनचेच्या  माध्यमातून विद्यार्थी, संशोधक, आणि स्टार्टअप कंपन्यांना प्रोत्साहन दिले जाईल. यामध्ये नवोदित उद्योजकांना अत्याधुनिक साधनसंपत्ती व मार्गदर्शन उपलब्ध करून देऊन त्यांच्या कल्पकतेस चालना देणे,  कार्यशाळा,नेटवर्किंग संधींच्या माध्यमातून उद्योजकता संस्कृती वाढविणे, स्थानिक आणि जागतिक विकासाला हातभार लावणारे स्टार्टअप्स निर्माण करणे, शिक्षण व उद्योग यांच्यातील दरी भरून काढण्यावर प्रामुख्याने भर दिला जाणार असल्याचे डॉ. गुप्ता यांनी सांगितले.

या फौंडेशनतर्फे  स्टार्टअप्ससाठी विविध उद्योगांतील अनुभवी सल्लागारांचे मार्गदर्शन, हार्डवेअर व सॉफ्टवेअर प्रोटोटायपिंगसाठी आवश्यक उपकरणे, 3D प्रिंटिंग व चाचणी सुविधा, बीजभांडवल सहाय्य, अनुदाने, गुंतवणूक आणि उपक्रम उभारण्यासाठी मदत, स्टार्टअप बूटकॅम्प व कार्यशाळा, व्यवसाय मॉडेल विकास, सादरीकरण याबाबत प्रशिक्षण,  कंपनी नोंदणी आणि निधीसाठी मार्गदर्शन, गुंतवणूकदार, उद्योजकांशी जोडणारे कार्यक्रम, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेबाबत मार्गदर्शन, ग्रंथालय आणि संशोधन संसाधने आणि बाजार विश्लेषण साधने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

या  फौंडेशनच्या स्थापनेसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग विभाग प्रमुख डॉ. सिद्धेश्वर पाटील व मेकॅनिकल विभाग प्रमुख  डॉ. सुनील रायकर यांनी विश्वस परिश्रम घेतले. संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त मा. आ. ऋतुराज संजय पाटील, प्राचार्य डॉ.संतोष चेडे आणि रजिस्ट्रार डॉ.लितेश मालदे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.