माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण

माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण

मुंबई वृत्तसंस्था: शिवसेना नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत बेपत्ता झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. पुणे विमानतळावरून त्याचे अपहरण झाल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला असून, पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. मात्र, या प्रकरणाला वेगळाच ट्विस्ट मिळाला आहे.

ऋषिराज सावंत हा चार्टर्ड विमानाने बँकॉकच्या दिशेने निघाल्याचे उघड झाले आहे. यंत्रणांनी संबंधित पायलटशी संपर्क साधला असता, ऋषिराज अंदमान निकोबारपर्यंत पोहोचल्याचे समोर आले. विमान परत बोलावण्याचे प्रयत्न सुरू असून, हे अपहरण होते की त्याने स्वतःच विमानात उड्डाण केले, याबाबत संभ्रम वाढला आहे.

तानाजी सावंत यांचा दावा – मुलगा अनोळखी लोकांसोबत नाही

तानाजी सावंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "आम्ही दररोज १५-२० वेळा बोलतो, पण आज काहीच संपर्क झाला नाही. मुलगा स्वतःच्या गाडीने न जाता दुसऱ्याच्या गाडीतून विमानतळावर गेला. त्याच्या सोबत अनोळखी कोणीही नाही, फक्त त्याचे मित्र आहेत."

पोलीस तपासात भर – विमान कुठे गेले? कोण होते सोबत?

पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून, ऋषिराज चार्टर्ड विमानाने पुण्यावरून निघाल्याची पुष्टी मिळाली आहे. विमान कोणत्या दिशेला गेले? कोण त्याच्या सोबत होते? त्याने स्वतः जाण्याचा निर्णय घेतला का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.

या नाट्यमय घटनेने राजकीय वर्तुळातही खळबळ माजली आहे. ऋषिराजला परत आणण्यासाठी प्रशासनाकडून वेगवान हालचाली सुरू आहेत. आता हे प्रकरण नक्की काय आहे, याचा उलगडा लवकरच होईल.