डॉ. आलोक जत्राटकर यांच्या पुस्तकांचे शनिवारी प्रकाशन

कोल्हापूर (प्रतिनिधी) - शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी तथा लेखक, वक्ते, संवादक डॉ. आलोक जत्राटकर यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन येत्या शनिवारी ५ जुलै रोजी सायंकाळी ५ : ३० वाजता दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे होणार आहे. या निमित्ताने ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांचे ‘समाज, माध्यमं आणि संविधानिक मूल्ये’ या विषयावरील विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
डॉ. जत्राटकर यांचे ‘समाज आणि माध्यमं’ हे पुस्तक अक्षर दालन प्रकाशनातर्फे प्रकाशित होते आहे, तर ‘ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे’ हा ललित लेख संग्रह भाग्यश्री प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकांचे प्रकाशन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि प्र - कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
अनुभवी माध्यमकर्मी डॉ. श्रीरंग गायकवाड आणि राजाराम महाविद्यालयाचे इंग्रजी अधिविभाग प्रमुख डॉ. रघुनाथ कडाकणे हे यावेळी पुस्तकांवर प्रथम भाष्य करणार आहेत. तरी, या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रकाशक अमेय जोशी आणि भाग्यश्री कासोटे - पाटील यांनी केले आहे.