व्हायरल व्हिडीओनंतर 'या' अभिनेत्याने दिले वृद्ध शेतकरी दाम्पत्याला बैल देण्याचे आश्वासन

व्हायरल व्हिडीओनंतर 'या' अभिनेत्याने दिले वृद्ध शेतकरी दाम्पत्याला बैल देण्याचे आश्वासन

मुंबई -  लातूरमधील एका वृद्ध शेतकरी दाम्पत्याचा हृदयद्रावक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये त्यांनी बैलाऐवजी स्वतःला नांगराला जुंपून घेतानाचं दृश्य दिसून येतं एक असहाय्य आणि काळजाला चटका लावणारा क्षण. सोनू सूद यांनी हा व्हिडीओ पाहून ट्विट करत म्हटलं, "आप नंबर भेजिए, हम बैल भेजते हैं." या छोट्या पण सशक्त संदेशाने शेतकरी कुटुंबीयांच्या वेदनेला त्यांनी आवाज दिला आणि त्यांना बैल देण्याचं आश्वासनही दिलं. त्यांच्या या कृतीचे सोशल मीडियावर सर्वत्र कौतुक होत आहे.

वृद्ध शेतकऱ्यांची परिस्थिती - 

मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील हाडोळती गावातील हे शेतकरी म्हणजे अंबादास गोविंद पवार, वय ६५. त्यांच्याकडे अडीच एकर कोरडवाहू शेती आहे. मात्र, शेतीच्या वाढत्या खर्चामुळे बैल विकत घेणं परवडणं शक्य न झाल्यानं त्यांनी स्वतः नांगराला जुंपून शेती करण्याचा मार्ग निवडला. त्यांच्या सोबत त्यांची पत्नीही मेहनतीने काम करत असल्याचं व्हिडीओतून दिसून येतं.

सामाजिक आणि सरकारी यंत्रणांना सवाल - 

या घटनेने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या स्थितीकडे लक्ष वेधलं आहे. कृषीप्रधान देश म्हणून अभिमान बाळगणाऱ्या भारतात अजूनही अनेक शेतकरी मूलभूत गरजांसाठी झगडत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकार आणि समाज यांना काय भूमिका निभवायला हवी, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.