शिवराज राक्षे, पृथ्वीराज मोहोळ पुन्हा एकदा भिडणार , दोघांना मिळणार 25-25 लाखांच बक्षीस
![शिवराज राक्षे, पृथ्वीराज मोहोळ पुन्हा एकदा भिडणार , दोघांना मिळणार 25-25 लाखांच बक्षीस](https://majhamaharashtra.in/uploads/images/202502/image_750x_67a5bd6422741.jpg)
सांगली : महाराष्ट्र केसरी 2025 ची स्पर्धा वादग्रस्त ठरली होती. अंतिम आणि उपांत्य सामन्यामध्ये झालेल्या राड्यानंतर शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. शिवराज आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये झालेल्या कुस्तीदरम्यान शिवराजची पाठ न टेकताच त्याला पराभूत घोषित केल्याचा दावा केला जात आहे. त्यावेळी झालेल्या राड्यादरम्यान शिवराज राक्षे याने पंचांना लाथ मारली होती. तर अंतिम सामन्यामध्ये महेंद्र गायकवाड याने 16 सेकंद बाकी असताना सामना सोडला होता. यानंतर पंचांनी कारवाईचा पवित्रा घेतल्यानंतर समितीने दोघांवर तीन वर्षांची बंदी घातली.
आता पुन्हा एकदा शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये कुस्ती होणार असल्याचं डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी जाहीर केलं आहे.
यावेळी बोलताना चंद्रहार पाटील म्हणाले, पृथ्वीराज मोहोळ याचे अभिनंदन, त्याने खेळण्याची तयारी दाखवली, हे खेळाडूच करू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पंचांच्या निर्णयाचं वाईट वाटतं असल्याचं म्हणाला यातून जे समजायचं ते प्रेक्षक आणि जनता समजली असेल. पृथ्वीराजने घेतलेला निर्णय काय आहे हे एखादा महाराष्ट्र केसरी झालेला पैलवान समजू शकतो. परत ही कुस्ती सांगली शहरामध्ये लावून दोघांना 25-25 लाख देऊन त्यांचा योग्य तो सन्मान लावून जनतेच्या मनतील संभ्रम दूर होईल. शिवराजला वाटत आहे त्याच्यावर अन्याय झाला आणि पृथ्वीराजला वाटत असेल की पंचांच्या निर्णयामुळे आपण महाराष्ट्रे केसरी झालो का? या सगळ्याच गोष्टीवर पडदा पडणार आहे. पृथ्वीराज मोहोळ हा 2025 चा महाराष्ट्र केसरी असून त्याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. महाराष्ट्रात जो काही वाद झालेला आहे तो सांगलीत येऊन थांबवण्याची तयारी आम्ही केली आहे.
'या' ठिकाणी रंगणार लढत
ही कुस्ती सांगली शहरामधील तरुण भारत या स्टेडियमध्ये होणार असल्याची माहिती चंद्रहार पाटील यांनी दिली आहे. मी दोनवेळा महाराष्ट्र केसरी म्हणून सांगतो की शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्या मनात संभ्रम झालेला आहे आणि तो थांबला पाहिजे. सांगली जिल्ह्याला कुस्तीची मोठी परंपर आहे. सांगलीत हिंदकेसरी गणपतराव आंदळकर आणि हिंदकेसरी मारूती माने आणि सहा ते सात महाराष्ट्र केसरी झाले आहेत. केसरीवरून सुरू असलेला वाद सांगलीमध्ये मिटावा हा आमचा हेतू असल्याचंही पाटील म्हणाले.