देऊया गरजूंना साथ, सतेज पाटील यांच्या वाढदिनी मदतीचा हात - कार्यकर्त्यांचा संकल्प

कोल्हापूर - मुलांना शैक्षणिक साहित्य वाटपापासून ते क्रिकेट स्पर्धा, कॅरम स्पर्धा, म्हशी पळवणे स्पर्धा, फळे वाटप, रक्तदान शिबिरांसह विविध उपक्रम राबवत काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांचा येत्या १२ एप्रिलला होणारा वाढदिवस भव्यदिव्य स्वरुपात साजरा करण्याचा संकल्प कार्यकर्त्याच्या बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला. आमदार सतेज पाटील यांचा येत्या १२ एप्रिलला ५३ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने वाढदिवसाचे नियोजन करण्यासाठी अजिंक्यतारा कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देताना हार पुष्पगुच्छ आणू नयेत त्या ऐवजी गरजू विद्यार्थ्यांना देण्यासाठी वह्या आणाव्यात असे आवाहन संयोजकांनी केले.
जिल्हा काँग्रेस कमिटी, विविध संघटना व तरुण मंडळांच्यावतीने सतेज क्रिकेट स्पर्धा, कॅरम स्पर्धा, म्हैशी स्पर्धा, फळे वाटप, रक्तदान शिबिर यासह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
आमदार जयंत आसगावकर म्हणाले, सतेज पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करू. यानिमित्ताने संविधान आणि महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहचवून समाजाला जागृत करण्याची गरज आहे. या वाढदिवसानिमित्त संपूर्ण जिल्हा सतेजमय करु असे आवाहन त्यांनी केले.
शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी सर्वसामान्यांना तळागाळातील कार्यकर्त्यांची काळजी घेणारा नेत्याचा वाढदिवस आहे हा वाढदिवस नाही तर एखादा सण म्हणून साजरा करा असे आवाहन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अनिल घाडगे म्हणाले, वाढदिवस एका बहुजनांच्या नेत्याचा आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला कळावे अशा पद्धतीने नियोजन करावे. भारती पवार म्हणाल्या, वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी कार्यक्रमाचा आयोजन करावे. सुनील मोदी यांनी वाढदिवसानिमित्त शिवाजी विद्यापीठाला आहे तेच नाव राहिले पाहिजे यासाठी सतेज पर्व शिवाजी विद्यापीठ हेच नाव खरं अशी मानवी साखळी आयोजित करण्यात आल्याचे सांगितले.
माजी महापौर आर. के. पोवार म्हणाले, आमदार सतेज पाटील यांनी आजवर सर्वांना भरभरून प्रेम दिले आहे त्यामुळे त्यांना साजेल असा वाढदिवस साजरा केला पाहिजे. तसेच मिरजकर तिकटी येथील अंध मुलांच्या शाळेला भोजन देणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
माजी नगरसेवक राजू लाटकर म्हणाले, सतेज पाटील यांनी आजवर केलेल्या कामाचा जयघोष आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसू दे. माजी महापौर महादेवराव आडगुळे यांनी सतेज पाटील यांनी सर्किट बेंचसाठी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने मोठे होर्डिंग उभारण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शशांक बावचकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी महापौर मारुतराव कातवरे, माजी महापौर भिमराव पोवार, सूर्यकांत पाटील-बुध्दिहाळकर, माजी नगरसेवक संजय मोहिते, बिद्री साखर कारखाना संचालक एस. बी. पाटील, आर. एस. कांबळे, माजी संचालक श्रीपती पाटील, गोपाळ पाटील, शशिकांत खवरे, माजी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत खोत आदींसह जिल्ह्यातील महाविकास आघाडी, इंडिया आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.