धुंद मनाचे, नव्या दमाचे, नवीन आले वर्ष सुखाचे अक्षरदालन मधील काव्यवाचनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

धुंद मनाचे, नव्या दमाचे, नवीन आले वर्ष सुखाचे अक्षरदालन मधील काव्यवाचनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर प्रतिनिधी  : ‘धुंद मनाचे, नव्या दमाचे, नवीन आले, वर्ष सुखाचे’ अशा शब्दात भावना व्यक्त करत अनेक कवी आणि कवियित्रींनी ३१ डिसेंबरची संध्याकाळ अत्यंत श्रवणीय केली. निमित्त होते ‘अक्षर दालन’ आणि ‘निर्धार प्रतिष्ठान’ यांच्यावतीने आयोजित काव्यमैफलीचे. २५ हून अधिक जणांनी यावेळी वैविध्यपूर्ण विषयांवरील कवितांचे सादरीकरण केले. 

       गेली काही वर्षे ‘काव्यवाचन आणि दुग्ध प्राशन’ ही संकल्पना घेवून या काव्यमैफलीचे आयोजन करण्यात येते. कवी अशोक भोईटे, प्रा. मानसी दिवेकर आणि रजनी हिरळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मैफीलीला रसिकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. 

‘सांगतो सर्वांस मी, माणूस माझी जात आहे

धर्म माझा ठेवला मी चौकटीच्या आत आहे’ अशी सामाजिक भावना व्यक्त करणारी कविता एकीकडे उपस्थितांना अंर्तमुख करत असताना 

‘द्रौपदी तूच तलवार घे हाती

या कलियुगात कृष्ण येणार नाही’ असे विदारक वास्तव दर्शवणारी कविताही यावेळी सादर झाली. 

‘बहर असावा आयुष्याला बारा महिने

हवा कशाला ऋतु वगैरे फुलण्यासाठी’ अशी विचारणाही यावेळी करण्यात आली. 

प्रेम,विरह, गावावरचे प्रेम, निसर्ग या विषयावरील कवितांचे सादरीकरण करण्यात आले. अगदी रंकाळ्याच्या वास्तवापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणाऱ्या कवितांचाही यामध्ये समावेश होता. 

        सुधा सरनाईक, आर. डी. नार्वेकर, प्रदीप साने, चंद्रकांत चव्हाण, गुरूनाथ हेर्लेकर, सुनील तौंदकर, आबा कुलकर्णी, राज्ञी परूळेकर, दिव्या कामत, क्षितीज कवडे, रमेश कुलकर्णी, नरहर कुलकर्णी, विनायक यादव, बदनाम शायर, शांत शीतल, अरूणा सरदेसाई, स्वाती मुनीश्वर निशांत गोंधळी, अनिल कावणेकर, सुरेश पुजारी, अशोक काळे, अरूण देसाई, दीपक जोशी, अनुराधा तस्ते, वनिता पाटील, समीर शेख, चंद्रशेखर बटकडली,अनिता दिवाण यांनी कवितांचे सादरीकरण केले. यावेळी भरत लाटकर, शिवाजीराव परूळेकर यांच्यासह रसिक उपस्थित होते. समीर देशपांडे यांनी प्रास्ताविक केले तर रविंद्र जोशी यांनी समारोप केला.

दुग्धपानाने समारोप

या काव्यमैफलीची सांगता दुग्धपानाने करण्यात आली. ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठीच्या या विधायक कार्यक्रमाला ‘अक्षरगप्पां’च्या या व्यासपीठाच्या माध्यमातून सुरूवात झाली. या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल उपस्थितांनी संयोजकांना धन्यवाद दिले.

प्रताप पाटील यांनी सूत्र संचालन केले.