पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना एक लाख मताधिक्याने निवडून आणून विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करू- संजय मंडलिक
मुरगुड (प्रतिनिधी) : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना एक लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून आणून विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करू, असा इशारा माजी खासदार संजयदादा मंडलिक यांनी दिला. मंडलिक गटाच्यावतीने आयोजित भगवा मेळाव्याला जोरदार प्रतिसाद मिळाला. मंडलिक गट आणि मुश्रीफ गट हे एकच कुटुंब असून आमचं आता मनापासून जुळलय. कुटुंबातील वाद आता मिटलाय, असेही ते म्हणाले.
भाषणात प्रा. मंडलिक पुढे म्हणाले, यापूर्वी जे झालं ते झालं. यापुढे आपल्याला एकाच मार्गाने जायचे आहे. महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संपूर्ण जिल्हाभर लक्ष द्यावे, त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आमची. श्री. मुश्रीफ यांना पाठिंबा कसला आम्ही तर घरचेच आहोत. स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी जात-पातीच्या पलीकडे रुजविलेल्या पुरोगामीत्वामुळे श्री. मुश्रीफ सातत्याने निवडून येतात. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार सत्तेवर येण्यासाठी जिल्ह्यातील महायुतीच्या सर्वच उमेदवारांना विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले.
पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, मंडलिक व मुश्रीफ हे एकच कुटुंब आहे. आपल्यातील समज- गैरसमज गंगार्पण करूया. स्व. खासदार कै. सदाशिवराव मंडलिक यांच्यामुळेच माझी राजकीय आणि सामाजिक जडणघडण झाली. निर्भीडपणा, धाडस, रोखठोक करारीपणा आणि स्वाभिमान हे गुण त्यांच्याकडून आले. स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या पाऊलखुणांवरूनच माझ्या संपूर्ण आयुष्याची वाटचाल सुरू आहे. यापुढेही प्रा. संजयदादा मंडलिक व माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या सोबतीने जिल्हा समृद्ध करू. जय- पराजयाची पर्वा न करता लढणं हीच स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांची शिकवण आहे. प्रा. संजय मंडलिक यांनी एखाद्या पराभवाने खचून जाऊ नये, त्यांना पुढच्या लोकसभेत खासदार म्हणून निवडून आणणे ही जबाबदारी आमची आहे. ॲड. वीरेंद्र मंडलिक यांचे राजकीय स्वप्न, सामाजिक जीवनातील इच्छा -आकांक्षा यांचा बॅकलॉग भरून काढू.
ॲड. विरेंद्र मंडलिक म्हणाले, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना एक लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करू. विकासाचं आणि विचारांचे राजकारण झालं पाहिजे, ही स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांची विचारधारा होती. त्यामुळेच मी या निवडणुकीतून थांबलो आहे.
कार्यक्रमात जयसिंग भोसले, विजय काळे, अनिल सिद्धेश्वर, प्रदीप चव्हाण, श्रीकांत भोसले, भगवान पाटील, राणाप्रताप सासणे, जीवनराव साळोखे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी गोकुळचे संचालक युवराज पाटील, केडीसीसीचे संचालक प्रताप उर्फ भैयासाहेब माने, आर डी पाटील - कुरुकलीकर, केशवकाका पाटील, माजी जि प सदस्या सौ. शिवानीताई भोसले, आनंदराव फराकटे, एन एस चौगुले, रामचंद्र सांगले, विश्वास कुराडे, शहाजी यादव, आप्पासाहेब तांबेकर, नंदकुमार पाटील, बाजार समितीचे संचालक बी. जी. पाटील, नामदेवराव मेंडके, दत्तात्रय मंडलिक आदीप्रमुख उपस्थित होते.
....................
*माझा डबा राहूनच जायचा....*
*ॲड. विरेंद्र मंडलिक म्हणाले, बालपणी मी सकाळी शाळेला जायचो, त्यावेळी सकाळी सहा वाजताच माझी आई मला डबा करून द्यायची. त्याचवेळी सकाळी मुश्रीफसाहेब आमच्या घरी यायचे, आणि स्व. खासदार सदाशिवराव मंडलिक माझ्या आईला सांगायचे की मुश्रीफसाहेब आलेत त्यांना खिमा चपाती करून द्या. या धावपळीत माझी आई मला द्यायचा डबा राहूनच जायचा, अशी मिश्किल टिपणी करताच उपस्थितांमध्ये टाळ्या झाल्या.*
*अंतर येऊ देणार नाही....*
*मंडलिकांच्या कार्यकर्त्यांना मी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपेन असे सांगत, मंत्री मुश्रीफ म्हणाले, यांच्यात आणि माझ्यात कधीही अंतर येऊ देणार नाही. गट-तट, पक्ष- पार्टी कधीच कुणाला विचारत नाही. आपल्याकडे आलेला माणूस समाधानाने परत जाईल, यासाठीच मी कार्यरत आहे.*
=========