नृसिंहवाडीत यंदाचा पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न
कुरुंदवाड (प्रतिनिधी) : शहरासह जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असून काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नदी पाणीपातळी देखील वाढली आहे. तर कृष्णा नदीच्या पाणी पातळीतील वाढीमुळे श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात चालू सालातील पहिला दक्षिणद्वार सोहळा मंगळवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास संपन्न झाला. नदीच्या पुराचे पाणी दत्त मंदिराच्या उत्तर द्वारातून श्रींच्या मुखचरणकमलाला स्पर्श करून दक्षिण द्वारातून बाहेर पडते, याला दक्षिणद्वार असे संबोधतात. भाविकांनी पहाटेच दर्शनासाठी गर्दी केली होती. पावसाच्या संततधारेमुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती, ज्यामुळे हा सोहळा यंदा प्रथमच साजरा करण्यात आला.