बचत गटांच्या वस्तुंच्या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्या - जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आवाहन
17 ते 19 मार्च दरम्यान दसरा चौकात प्रदर्शन
कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
कोल्हापूर, आंतरराष्ट्री य महिला दिनानिमित्त महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) व राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक यांच्या संयुक्त विद्यमाने नव तेजस्विनी -महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्पांतर्गत बचत गटाच्या उत्पाादनांचे दिनांक 17 ते 19 मार्च 2023 या कालावधीत सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत दसरा चौक मैदान, कोल्हापूर येथे प्रदर्शन व विक्री होणार आहे. बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्री प्रदर्शनास जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड ) यांच्या सयुंक्त विद्यमाने हे प्रदर्शन घेण्यात येत आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) कोल्हापूर अंतर्गत स्थापित बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला व वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच सन 2023 हे आर्थिक वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या अनुषंगाने हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. यामध्ये नाबार्ड मार्फत सांगली, सातारा व रत्नागिरी तसेच नाबार्ड अंतर्गत कार्यरत असलेल्या अशासकीय संस्थेच्या बचत गटातील महिलांचे स्टाँल असतील.
प्रदर्शनामध्ये माविम, नाबार्ड स्थापित, जिल्हा ग्रामीण यंत्रणा (DRDA), DAY -NULM कोल्हापूर महानगरपालिका अशा एकूण 110 बचत गटांचे स्टाँल लावण्यात येणार आहेत. बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तू तसेच खाद्यपदार्थ यांचा समावेश असेल. यामध्ये कोल्हापुरी मसाले, कोल्हापुरी चप्पल, विविध प्रकारचे तांदूळ, पापड, लोणचे, मातीची नक्षीदार भांडी, बांबूच्या विविध वस्तू, गारमेंट, तृणधान्य महत्व सर्वसामान्य पर्यंत पोहचावे याकरिता ज्वारी, बाजरी, नाचणी, नाचणी युक्त पदार्थ,राजगिरा याचे स्वतंत्र स्टाँल लावण्यात येणार आहेत तसेच विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करुन विक्रीकरिता ठेवण्यात येणार आहेत.
या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते होणार असून मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिह चव्हाण प्रमुख उपस्थित राहणार आहेत. नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी आशुतोष जाधव, विभागीय कृषी व पणन विभागाचे विभागीय सरव्यवस्थापक डॉ सुभाष घुले, बँक ऑफ इंडियाचे जिल्हा अग्रणी व्यवस्थापक गणेश गोडसे, जिल्हा ग्रामीण यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे.