उद्याच्या कोल्हापूर बंदची हाक रद्द
कोल्हापूर (प्रतिनिधि) : कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावं आणि कोल्हापूरची हद्दवाढ व्हावी, या मागण्यांकडं शासनाचं दुर्लक्ष झाल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय कृती समितीनं उद्या मंगळवारी कोल्हापूर बंदची हाक दिली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्यानं हा बंद मागे घेण्यात आलाय, अशी माहिती कृती समितीचे निमंत्रक आर के पोवार यांनी पत्रकार बैठकीत दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूरची रखडलेली हद्दवाढ व्हावी, तसंच कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं सर्कीट बेंच व्हावं अशी कोल्हापुरकरांची मागणी आहे. याबाबत शासनाकडं वारंवार पाठपुरावाही करण्यात आलाय. मात्र, शासनाचं याकडं दुर्लक्ष झालंय. दरम्यान, उद्या मंगळवारी कोल्हापुरात होणाऱ्या शाश्वत परिषदेसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार होते. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील सर्वपक्षीय कृती समितीनं कोल्हापूरकरांच्या या मागण्यांकड दुर्लक्ष झाल्याच्या निषेधार्थ, मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर बंदची हाक दिली होती. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्याचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द झाल्यामुळं कोल्हापूर बंद मागे घेण्यात आला आहे.
यावेळी दिलीप देसाई, अॅडव्होकेट बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, चंद्रकांत पाटील, सुनीता पाटील,गीता हसुरकर, राजू जाधव, कॉम्रेड दिलीप पवार, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट सर्जेराव खोत ,माजी अध्यक्ष अॅडव्होकेट गिरीश खडके यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी, वकील, महिला आणि नागरिक उपस्थित होते.