परमदैवत आई-वडिलांचा सन्मान करा देवप्रकाश महाराजांचा संदेश : प्रेमप्रकाश मंदिराचा वार्षिक महोत्सव साजरा

परमदैवत आई-वडिलांचा सन्मान करा देवप्रकाश महाराजांचा संदेश : प्रेमप्रकाश मंदिराचा वार्षिक महोत्सव साजरा

ज्येष्ठांसह आई-वडिलांचा सन्मान करा, तेच आपले परमदैवत आहेत, निराधारांचे आधार व्हा, व्यसनमुक्त समाजनिर्मिती होण्यासाठी अविरत प्रयत्न करा, सेवा हाच खरा मानवता धर्म आहे, असा संदेश स्वामी देवप्रकाश महाराज यांनी दिला.

श्री प्रेमप्रकाश मंदिराच्या चाळीसाव्या वार्षिक महोत्सवानिमित्त येथील राधाकृष्ण लॉनवरील जनसमुदायास संबोधित करताना स्वामी देवप्रकाश महाराज बोलत होते.

स्वामी देवप्रकाश महाराज यांच्या अध्यक्षतेखाली गेले तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात प्रेमप्रकाश मंडळाचे संत, कलाकार व गुणीजनांकडून अमृत संदेशवाणीचा वर्षाव करण्यात आला. प्रभातफेरी व प्रेमप्रकाश ध्वज फडकावून महोत्सवास प्रारंभ झाला. रोज सायंकाळी होणाऱ्या सत्संग व कीर्तनाचा लाभ भक्तांनी घेतला. चाळीस जणांचे सामूहिक मौजीबंघन व सव्वादोनशे जणांनी यज्ञोपवीत धारण केले.

स्वामी शांतीप्रकाश महाराजांचा १५६वा मनोवांचीतदिनही साजरा करण्यात आला. 'श्री प्रेमप्रकाश 'ग्रंथभोग साहिब'चे वाचन करण्यात आले. त्याचे श्रवण हजारो भक्तांनी केले. 

महाप्रसादाने महोत्सवाची सांगता झाली. श्री प्रेमप्रकाश मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, सेवाधारी व सदस्यांनी महोत्सवाचे संयोजन केले.

देशभरातून भक्तांची हजेरी

या महोत्सवासाठी संपूर्ण देशभरातून भक्त आले. मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात, मुंबई, कल्याण, उल्हासनगर व राज्यातील उर्वरित भागातून भक्तजनानी महोत्सवासाठी एकच कधी केली होती.