पर्यावरणपूरक गणेशोत्सव नियोजनासाठी जिल्हास्तरीय बैठक संपन्न

पर्यावरणपूरक गणेशोत्सव नियोजनासाठी जिल्हास्तरीय बैठक संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधि)  : पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमासाठी जिल्हा परिषद सज्ज झाली असून दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही जास्तीत जास्त कुटुंबे या उपक्रमामध्ये सहभागी करून घेणेसाठी प्रयत्न केले जात आहेत. या उपक्रमाच्या नियोजनाबाबत आज जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली. " जिल्हयाच्या या नाविण्यपूर्ण उपक्रमाचे हे दहावे वर्ष असून या उपक्रमामुळे लोकांमध्ये झालेला पर्यावरणपूरक  वर्तन बदल या वर्षी ही टिकवायचा आहे. यासाठी सर्वांनी या उपक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवावा." असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केले आहे.  

कोल्हापूर जिल्हयामध्ये सन 2015 पासून पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करणेत येत आहे. सन 2015 ते 2023 या नऊ वर्षामध्ये या उपक्रमाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमाचे हे दहावे वर्ष असल्याने हा उपक्रम आणखी प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी वाढली असल्याने यावर्षी देखील अत्यंत नियोजनबध्द पध्दतीने हा उपक्रम यशस्वी करणेबाबत तसेच जिल्हयातील नदी/ तलाव, पिण्याच्या पाण्याच्या विहीरी इ. सार्वजनिक जलस्त्रोतांचे प्रदूषण होणार नाही याची दक्षता घेणेबाबत सर्व ग्रामपंचायतींना सूचना देण्यात आलेल्या आहेत. 

गावामध्ये 'एक गावं, एक गणपती' या संकल्पनेनुसार सार्वजनिक गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना करणे, घरगुती गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना करताना धातुच्या/ संगमरवरी/ इतर पर्यायी किंवा मातीच्या मुर्तींची प्रतिष्ठापना करणे, तसेच 'घरगुती गणेशमुर्तींचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करणे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम विसर्जन स्थळी (कृत्रीम तलाव/कुंड) विसर्जन करणेबाबत गावस्तरावर प्रबोधन करणे. तसेच गावनिहाय मुर्ती संकलन व पर्यायी विसर्जनासाठी ठिकाणे निश्चित करून त्याबाबत गावस्तरावर प्रसिध्दी करणे. निश्चित केलेल्या ठिकाणांची स्वच्छता करणे. 

मुर्ती विसर्जनाकरिता आवश्यक काही संख्या किंवा वापरात नसलेल्या पाण्याच्या खणी निश्चित करून, फेरविसर्जनासाठी दिलेल्या मुर्ती शक्य असल्यास सर्वांच्या अनुमतीने मुर्ती कुंभाराकडे परत देणेबाबतचे नियोजन करणे. यासाठी गावस्तरावर कुंभारांच्या नावांची यादी उपलब्ध करून देणे. निर्माल्य संकलनासाठी ठिकाणे निश्चित करणे, निर्माल्य जमा झालेनंतर त्याची वाहतूक व्यवस्था व त्याच्या सुयोग्य व्यवस्थापनाकरिता जागेची निश्चिती करणे. निर्माल्यातून येणारे प्लास्टीक हे वेगळे केले जाईल यासाठी घरातून निर्माल्याचे वर्गीकरण केले जाईल याबाबत आशा, अंगणवाडी सेविका, शालेय विद्यार्थी यांचेमार्फत जनजागृती करणे अशा सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या आहेत. 

या उपक्रमाचे सनियंत्रण करणेसाठी तालुकास्तरावरून प्रत्येक गावासाठी संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. तसेच जिल्हास्तरावरून या उपक्रमाचे सनियंत्रण केले जाणार आहे. घरगुती गणेश विसर्जनादिवशी जिल्हा परिषद, कोल्हापूर, व उपप्रादेशिक कार्यालय, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, कोल्हापूर यांच्या पथकाव्दारे गावामध्ये केलेल्या नियोजनाच्या पाहणीसाठी भेटी दिल्या जाणार आहेत.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस.  यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर आयोजित या बैठकीसाठी तालुक्यातील सर्व गटविकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीव्दारे उपस्थित होते. पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमाबाबत जल जीवन मिशनच्या प्रकल्प संचालक माधुरी परीट यांनी प्रास्ताविक केले. तर पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड तसेच उपप्रादेशिक कार्यालय, प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडील अंकूश पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.