पाणी व स्वच्छता क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा होणार सत्कार

पाणी व स्वच्छता क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा होणार सत्कार

कोल्हापूर : पाणी व स्वच्छतेबाबत गावात  उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा जागतिक महिला दिनानिमीत्त सत्कार करण्यात येणार आहे. याबाबत गटविकास अधिकारी यांना पत्राव्दारे सुचित करण्यात  आले असून सर्व ग्रामपंचायतींनी महिलांचा यथोचित सन्मान करण्याचे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केले आहे.      

शनिवारी संपूर्ण देशात जागतिक महिला दिन साजरा करण्यात येत आहे. त्यानिमीत्त पाणी व स्वच्छता विभाग, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांच्या आयोजनाचे शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार सर्व ग्रामपंचायतीमध्ये जागतिक महिला दिनानिमित्य महिलांची विशेष धाव (वॉश रन ) आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये महिला, बचत गटातील उमेद, किशोरवयीन मुली, विद्यार्थीनी,स्वच्छता कर्मचारी,पाणी व स्वच्छता समितीचे सदस्य व ग्रामपंचायत सदस्य आणि समुदयातील प्रभावशाली लोकांचा समावेश करून पाणी, स्वच्छता व आरोग्य संबंधित संदेशाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. यासह ८ मार्च रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष महिला सभेचे आयोजन करावयाचे आहे.‌ तसेच पाणी, स्वच्छता व आरोग्य संबंधित कार्यक्रमाच्या अंमलबजावणी दरम्यान सद्यस्थितीत येणाऱ्या अडचणी बाबत चर्चा, कथा कथन सत्र, पथनाट्य, मासिक पाळी व्यवस्थापन, Ftk किट चाचणी असे उपक्रम राबवण्यात येणार आहेत.  

ग्रामस्तरावर पाणी, स्वच्छता व आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या स्वच्छता कामगार महिला, स्वच्छतेच्या मालमत्तेचे परिचालन, देखभाल व दुरुस्ती संबंधित सुयोग्य व्यवस्थापन करणारे महिला नेतृत्व, किशोरवयीन चॅम्पियन, क्षेत्रीय तपासणी संचाच्या सहाय्याने पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण करणाऱ्या महिलांचा तालुकास्तरावर सत्कार सोहळा आयोजित करावयाचा असल्याची माहिती जल जीवन  मिशनच्या प्रकल्प् संचालिका  तथा स्वच्छ भारत मिशन  जिल्हा समन्वयक माधुरी परीट यांनी दिली.