सीएम देवेंद्र फडणवीसांसमोर आंदोलनाचा इशारा ; कोल्हापूरात आंदोलकांची धरपकड

सीएम देवेंद्र फडणवीसांसमोर आंदोलनाचा इशारा ; कोल्हापूरात आंदोलकांची धरपकड

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अपमान करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरवर कारवाई करावी या मागणीसाठी  इंडिया आघाडी आणि शिवप्रेमींनी कोल्हापुरात आक्रमक पवित्रा घेतला आहे. 

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शिवप्रेमींनी त्यांच्यासमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे. पोलिसांशी झालेल्या बैठकीनंतर आंदोलनाचा निर्धार कायम ठेवल्याने आज (6 मार्च) कोल्हापूर आंदोलकांची धरपकड सुरु केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा देणाऱ्या आंदोलकांना पोलीस ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर पोलिसांनी रात्रीच प्रमुख कार्यकर्त्यांना नोटीस पाठवल्या आहेत. आज सकाऴी हर्षल सुर्वे, तसेच मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, मराठा सेवासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

दुसरीकडे, प्रशांत कोरटकरला 11 तारखेपर्यंत अंतरिम जामीन मिळाला असल्याने आंदोलन स्थगित करण्याची विनंती  कोल्हापूर पोलिसांची केली आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये आंदोलकांसोबत पोलिसांनी बैठक केली. मात्र, प्रशांत कोरटकरबरोबरच आता  युट्यूब कमेंटमधून धमकी देणाऱ्या केशव वैद्यवर देखील कारवाई करा अशी आंदोलकांनी  मागणी केली आहे. याच पार्श्वभूमिवर आज आंदोलकांची धरपकड करण्यात आली.