पुण्यात शरद पवार गटाच्या 'या' आमदाराचे विजयाआधीच पोस्टर्स
पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली. या पार पडलेल्या निवडणुकीत महाराष्ट्र राज्यात एकूण ६५ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक ७६.२५ टक्के, तर मुंबई शहरामध्ये सर्वात कमी मतदान ५२.०७ टक्के मतदान झाले. यंदा वाढलेल्या मतदानाचा टक्क्याने कोणाला फटका बसणार आणि जास्तीचे मतदान कोणाला तारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आता सर्व दिग्गज आणि नव्या उमेदवारांचे भवितव्य मतदानपेटीत असून दोन दिवसांनी म्हणजेच २३ नोव्हेंबरला निकाल येणार आहे. यातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे.मतदान होत नाही तोवरच शरद पवार गटाच्या आमदाराचे विजयाचे पोस्टर्स लागले असून त्यांची विजयी रॅलीसुद्धा काढण्यात आलीये.
पुण्यामधील खडकवासला मतदारसंघामध्ये तिरंगी लढत झाली आहे. शरद पवार गटाकडून सचिन दोडके, मनसेकडून मयुरेश वांजळे आणि भाजपकडून भीमराव तापकीर असा तिरंगी सामना झाला आहे. सचिन दोडके यांच्या समर्थकांनी २०१९ मध्ये निवडणूक झाल्यावर निकालाआधीच विजयाचे पोस्टर्स लावले होते. मात्र त्यावेळी सचिने दोडके यांचा २५९५ मतांनी निसटता पराभव झाला होता. मात्र यंदा आपल्या पूर्ण ताकदीने दोडके मैदानात उतरले होते, परंतु भीमराव तापकीर यांचे तगडे आव्हान त्यांच्यासमोर आहे. तर मयुरेश वांजळेंना जर जनतेने संधी द्यायचं ठरवलं तर तेसुद्धा जायंट किलर ठरवू शकतात.सचिन दोडके मागील निवडणुकीमध्ये फक्त अडीच हजार मतांनी पराभूत झाले होते. मात्र निकालाआधीच वारजे माळवाडीमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार सचिन दोडके यांच्या समर्थकांनी त्यांचे विजयाचे पोस्टर लावले आहेत.