शेतकऱ्यांच्या कामासाठी कसेही हाका जू टाकणार नाही आणि सरी सोडूनही जाणार नाही - आ. हसन मुश्रीफ यांचे भावनिक उद्गार
काबाडकष्ट करणारा मी बिनमारका राबणारा बैल
*मी हिंस्र वाघही नाही आणि टायगरही नाही*
कागल (प्रतिनिधी) : गोरगरीब शेतकऱ्यांसाठी काबाडकष्ट करणारा मी बिनमारका राबणारा बैल आहे. शेतकऱ्यांच्या कामासाठी कसेही हाका. जनतेने खांद्यावर दिलेले जू टाकणार नाही आणि सरी सोडूनही जाणार नाही, असे भावनिक उद्गार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. मी हिंस्र वाघही नाही आणि टायगरही नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
उत्तूरमध्ये उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघातील नागरिकांच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात आमदार मुश्रीफ बोलत होते.
भाषणात आमदार मुश्रीफ पुढे म्हणाले, सलग सहाव्यांदा विजयी होण्याचे माझे रेकॉर्ड झाले. या रेकॉर्डचे खरे शिल्पकार तुम्ही आहात. आजचा दिवस विजय साजरा करण्याचा दिवस आहे, टीकाटिप्पणी करण्याचा दिवस नाही. वचनपूर्तीची आठवण करून देणारा हा दिवस आहे. जनतेच्या पदरात मी काय टाकू शकतो, हे सांगणारा हा दिवस आहे.
स्वर्गीय कै. बाबासाहेब कुपेकर यांनी या विभागाच्या हरितक्रांतीसाठी आंबेओहोळ प्रकल्पाची सुरुवात केली होती. त्याच्या पूर्णत्वाचे भाग्य मला मिळाले. आंबेओहोळ प्रकल्पाच्या माध्यमातून या विभागातील शिवारात पाणी फिरवण्यासाठी माझे शर्थीचे प्रयत्न आहेत. या विभागातील बेरोजगारी कमी करण्यासाठी येथे उद्योगधंदे आणून बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. या विभागात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र ही सुरू करणार आहोत.
*कल्याणकारी व्हिजन......!*
मंत्री मुश्रीफ म्हणाले, गोरगरीब सर्वसामान्य शेतकऱ्यांनी माझी नेहमीच पाठराखण केली आहे. शेतकऱ्यांच्या, काबाडकष्ट करणाऱ्यांच्या जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी उर्वरित आयुष्यातील प्रत्येक क्षण वेचणार आहोत. गरीब व सामान्य माणसांचे हित हेच माझे व्हिजन आहे.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेशराव आपटे म्हणाले, विरोधकांनी प्रचंड जातीयवादाचे विष पेरूनसुद्धा पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांचा सहाव्यांदा विजय झाला हेच या भूमीचे पुरोगामीत्व आहे. मुश्रीफ यांनी गोरगरीब, कष्टाळू आणि गरजवंतांची सेवा केली. त्यांच्या आशीर्वादांची ही फलश्रुती आहे. येत्या पाच वर्षात या विभागातील शिक्षण व्यवस्था सुधारण्याबरोबरच आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि दर्जेदार करण्यासाठी त्यांच्याकडे पाठपुरावा करू, असेही ते म्हणाले.
माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे म्हणाले, पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांचे अथक प्रयत्न आणि परिश्रमातून उत्तूर विभागाला आंबेओहोळच्या रूपाने साक्षात वरदहस्त मिळालेला आहे. यामुळे या विभागाच्या शेतीसह पिण्याच्याही पाण्याचा प्रश्न कायमचा निकालात निघालेला आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उमेशराव आपटे, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे, संभाजीराव तांबेकर यांचीही मनोगते झाली.
*चांगला राजकारणी, संवेदनशील माणूस आणि कर्तुत्ववान राजकारणी.....!*
उमेशराव आपटे म्हणाले, हसन मुश्रीफ म्हणजे एक चांगला राजकारणी, संवेदनशील माणूस आणि कर्तुत्वान लोकप्रतिनिधी. त्यामुळे या निवडणुकीत गट- तट, पक्ष या सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्यांना मनापासून पाठबळ देण्याचा निर्णय घेतला.
मुश्रीफ यांचा सत्कार जेष्ठ नागरिक पांडुरंग दिवटे (वडकशिवाले) व संतू शिवणे (आरदाळ) यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच किरण अमनगी, वसंतराव धुरे, उमेश आपटे, काशिनाथ तेली, संभाजी तांबेकर यांची भाषणे झाली. यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक सुधीर देसाई, विश्वनाथ करंबळी, मारुतीराव घोरपडे शिवलिंग सन्ने, एम के देसाई, विश्वासराव देसाई, विजय वांगणेकर, समीक्षा देसाई, प्रकाश खटावकर, सुधीर सावंत उपस्थित होते.
स्वागत आजरा पंचायत समितीचे माजी सभापती शिरीष देसाई यांनी केले. प्रास्ताविक माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ तेली यांनी केले.