ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या, पीडितेच्या आईची न्यायासाठी भावनिक मागणी

बीड : बीड येथील एका महाविद्यालयीन तरुणीने धाराशिव येथे मामाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. या प्रकरणात आरोपी अभिषेक कदम याला मिळालेल्या जामिनाविरोधात आता धाराशिव पोलीस न्यायालयात अपील करणार आहेत, अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.
मुलीचं लग्न ठरलेलं असतानाही अभिषेक तिला वारंवार ब्लॅकमेल करत होता, आणि या मानसिक छळाला कंटाळून तिने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप आहे. घटनेला एक महिना उलटूनही न्याय मिळत नसल्याने पीडितेच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक भावनिक पत्र लिहून न्यायाची मागणी केली होती.
नीलम गोऱ्हे यांनी बीड येथे पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या. या वेळी त्यांनी आश्वासन दिलं की, एफआयआर झाल्यानंतर आता पूरक जबाब घेण्यात येईल आणि संबंधित आरोपींविरोधात कठोर कारवाई केली जाईल.
त्याचबरोबर, शाळा-महाविद्यालयातील मुलींना त्रास देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. “कोणी त्रास देत असेल तर तात्काळ पोलिसांकडे तक्रार करावी,” असं आवाहन त्यांनी मुलींना केलं.
काय म्हणाली पीडितेची आई ?
“नीलम गोऱ्हे आमच्याकडे आल्या होत्या, त्यांना मी एवढंच सांगितलं माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. बीडमध्ये जे छेडछाडीचे रॅकेट चालू आहे, त्यावर कारवाई झालीच पाहिजे. माझ्या मुलीबरोबर जे घडलं, ते इतर मुलींशी घडू नये.” तसंच, स्वप्निल राठोड नावाच्या अधिकाऱ्याने त्रास दिल्याचा आरोप पीडितेच्या आईने केला असून, हे प्रकरण बीड पोलिसांकडे वर्ग करण्याची मागणी केली आहे. “जर आरोपीची जामीन रद्द झाली नाही, तर मी काहीतरी करून घेईन,” असा इशाराही त्यांनी दिला.