वडिलांचा मृतदेह दारात , आधी दिला दहावीचा पेपर मग केले अंत्यसंस्कार

गोंदिया : दहावीची परीक्षा म्हणजे जीवनातील अत्यंत महत्वाचा टप्पा समजला जातो. अशावेळी आपल्या घरातील आधारच निघून गेला आणि तेही परीक्षेच्या दिवशीच, हे कीती मोठं दु:ख. मात्र, हे दु:ख सहन करीत गोंदिया जिल्ह्यात गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार येथील विद्यार्थ्याने जीवनातील हा कठीण क्षण पार केला. आदेश ठानेश्वर कटरे याने आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार आणि त्याने आधी मराठीचा पेपर दिला, नंतरच वडिलांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला.
पहिलाच पेपर आणि वडिलांचे निधन
इयत्ता दहावीत असलेल्या आदेशचा काल, शुक्रवार २१ फेब्रुवारी रोजी मराठी विषयाचा पहिलाच पेपर होता. त्यातच वडील ठानेश्वर कटरे यांचा पहाटेच्या सुमारास आकस्मिक निधन झाले. वडिलांचा मृतदेह दारात असताना परीक्षेला जावे तरी कसे? लोक काय म्हणतील अशा अनेक प्रश्नांनी त्याच्या मनात काहूर माजलं होतं. मात्र मनात गोंधळ सुरु असतानाच पेपरला गैरहजर राहिल्याने पूर्ण शैक्षणिक वर्ष वाया जाणार, हेही त्याच्या लक्षात आलं.
एक तासात पेपर देवून निघाला आणि वडिलांना खांदा दिला
अखेर आदेशने मन घट्ट करुन वडिलांचा मृतदेह दारात असताना पेपर देण्याचा निर्णय घेतला आणि मोहाडी येथील परीक्षा केंद्रावर जाऊन मराठीचा पेपर दिला. मराठीचा पेपर एक तासात सोडून घरी माघारी परतला आणि वडिलांच्या पार्थिव शरीराला त्याने खांदा दिला. या सर्व संवेदनशील प्रसंगाचे गावकरी साक्षीदार झाले. यावेळी आप्त, स्वकीय त्याच्या पाठीशी खंबीर उभे राहिले.