भाजपाच्या जाहीरनाम्यात सर्वसामान्यांच्या स्वप्नांचे प्रतिबिंब

भाजपाच्या जाहीरनाम्यात सर्वसामान्यांच्या स्वप्नांचे प्रतिबिंब

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भाजपाचा जाहीरनामा हा समाजातील सर्वच घटकांना डोळ्यापुढे ठेवून तयार करण्यात येणार आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार करण्याच्या हेतूने  या जाहीरनाम्यासाठी तळागाळातील नागरिकांकडून सूचना मागवण्यात आल्याने तो खऱ्या अर्थाने परिपूर्ण असेल, असा विश्वास प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी कोल्हापूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला. 

अन्य कोणत्याही पक्षापेक्षा भाजपाच्या जाहीरनाम्यात संपुर्ण राज्यभरातील जनतेत कमालीची उत्सूकता आहे. कारण भाजपाने २०१४ पासून सत्ता हाती आल्यापासून जेवढे लोककल्याणकारी निर्णय घेतले तितके आजवर अन्य कोणत्याही सरकारला त्यांच्या दीर्घ कालावधीच्या कारभारातही घेणे शक्य झाले नव्हते. यात आणखी  अनेक लोककल्याणकारी महत्वाच्या निर्णयांची भर टाकण्यासाठी सर्व क्षेत्रांची निवड करण्यात आली असल्याचे उपाध्ये यांनी नमूद केले.

जाहीरनाम्यातील मुद्द्यांची अंमलबजावणी करण्यासाठी विषयवार अंमलबजावणी समित्या निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे  भाजपा महायुती सरकारच्या कारकीर्दीत राज्याच्या दरडोई उत्पन्नात भरघोस वाढ झालेली आहे. मात्र इतक्यावरच न थांबता या दरडोई उत्पन्नात आणखी कोणकोणत्या मार्गाने वाढ करण्यात येईल, यासाठी भाजपाचे नेते प्रयत्नशील आहेत. त्याचे प्रतिबिंब जनतेला भाजपाच्या जाहीरनाम्यात नक्कीच पाहायला मिळेल , असा विश्वास  उपाध्ये यांनी व्यक्त केला.

नागरिकांनी भाजपा वचननाम्यासाठीच्या सूचना लवकर पाठवाव्यात. विविध स्तरावरून सूचना मागविण्यासाठी प्रदेश भाजपाच्या वचननामा समितीने सुमारे दहा हजारपेक्षा जास्त पत्रे राज्यभर पाठवली आहेत. त्यामुळे नागरिकांनी भाजपा वचननामा समितीकडे आपल्या सूचना विश्वासाने पाठवाव्यात, असे आवाहन उपाध्ये यांनी केले. 

 भाजपा जनतेच्या कल्याणासाठी प्रतिबद्ध असून राज्याला अधिकाधिक समृद्ध बनविण्याकरता कार्यरत आहे. "लाडकी बहिण" योजनेतून महिलांना दिल्या जाणाऱ्या निधीमुळे महिलांच्या क्रयशक्तीत वाढ झाली असून त्यामुळे राज्यासह देशाच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. सर्वसामान्यांच्या जीवनात आणखी असेच सकारात्मक आणि दूरगामी परिणाम करणारे लाभ भाजपा जाहीरनाम्याद्वारे जनतेपुढे आणेल असे उपाध्ये यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी महेश जाधव, विजय जाधव, राजवर्धन नाईक निंबाळकर, नाथजी पाटील, राहुल चिकोडे यांची उपस्थिती होती.