मन-मनगट-मेंदू स्वतःच्या स्वाधीन ठेवा - युवराज पाटील
अशोकराव माने इन्स्टिट्यूटमधील इंडक्शन प्रोग्रॅममध्ये मार्गदर्शन
वाठार तर्फ वडगाव प्रतिनिधी - "विद्यार्थ्यांनो, मन-मनगट-मेंदू स्वतःच्या स्वाधीन ठेवा. जे युवक सोशल मीडियाचा अतिवापर करीत आहेत; त्यांनी आपले मन, मनगट व मेंदू दुसऱ्याच्या ताब्यात दिले आहे. सोशल मीडिया वापरताना स्वतःवर आपले नियंत्रण असणे गरजेचे आहे. आपली स्वतःची आचारसंहिता तयार करा. आपल्या कर्तृत्वाचा रंग महत्त्वाचा आहे. कष्ट करण्याची तयारी ठेवा. कष्टानंतर येणारा घामाचा वास हा जगातील सर्वात महाग परफ्युम आहे. जिद्द असेल तरच शोधाचा जन्म होईल. योग्य ठिकाणी आपल्या क्षमतांचा वापर करा. स्वतःला ओळखायला शिका. तुमच्या बाह्यसौंदर्यापेक्षा मनगटात आणि काळजात काय आहे ते महत्त्वाचे आहे. जसे बुद्धिबळाच्या पटावर प्यादी हा वजीर होण्याची ताकद ठेवतो, तसे इंजिनिअरिंगची चार वर्षे कष्ट घेतले तर कोणतीही गोष्ट अवघड नाही; तुम्ही नक्की यशस्वी व्हाल" असे प्रतिपादन लोकराजा शाहू ॲकॅडमीचे संस्थापक, प्रख्यात वक्ते युवराज पाटील यांनी केले.
ते अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या 'इंडक्शन प्रोग्राम' मध्ये बोलत होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. पी. बी. घेवारी उपस्थित होते.
श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समध्ये आयोजित 'इंडक्शन प्रोग्रॅम' मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून प्रथम वर्ष विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रख्यात वक्ते युवराज पाटील पुढे म्हणाले, "आपला प्राधान्यक्रम चुकवू देऊ नका. मेहनतीची तयारी ठेवा. संघर्ष करा. स्वतःची लायकी सिद्ध करा. सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात संस्कार जपण्याचा कसोशीने प्रयत्न करा. व्यावहारिक दृष्टीकोन व तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करून जगावर राज्य करा."
कार्यक्रमासाठी उपस्थित महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व वक्ते गणेश लोळगे म्हणाले, "आपल्या क्षेत्रात सर्वोत्तम व्हा. ध्येय मोठे ठेवा आणि ते गाठण्यासाठी प्रयत्नांची शिडी करा. आपली कला, चांगल्या सवयी जोपासा. जिद्द आणि मेहनतीच्या बळावर ध्येयप्राप्ती करा. भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून कळेल असे कर्तृत्व करा."
दरम्यान द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी गायत्री कदम व आरती पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. पी. बी. घेवारी यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. जे. एम. शिंदे यांनी करून दिली.
विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच प्रथम वर्ष विभागातील स्टुडंट असोसिएशनच्या नवनिर्वाचित सदस्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचे, सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरणही संपन्न झाले. याद्वारे देवांग शिंदे (कॉम्प्युटर सायन्स) यांना मिस्टर फ्रेशर व मिस फ्रेशर म्हणून सिद्धी माने (ई अँड टीसी) यांना गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विभागप्रमुख प्रा. अमोल सूर्यवंशी यांनी केले. तर सूत्रसंचालन विद्यार्थिनी स्नेहल पाटील व आदिती कुसाळकर यांनी केले.
यावेळी सर्व डीन आणि विभागप्रमुख यांच्यासह प्रथम वर्ष विभागातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह माने, जि. प. माजी सदस्या मनिषाताई माने यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.