महात्मा फुले यांना शिक्षणातून बौद्धिक, सामाजिक व नैतिक विकास अभिप्रेत : डॉ. श्यामसुंदर मिरजकर

महात्मा फुले यांना शिक्षणातून बौद्धिक, सामाजिक व नैतिक विकास अभिप्रेत : डॉ. श्यामसुंदर मिरजकर

कोल्हापूर : महात्मा फुलेंचे शैक्षणिक कार्य व विचार केवळ अक्षर ओळख व अंकगणित इतक्या पुरते मर्यादित नव्हते, त्यांचे शिक्षण हे बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना बौद्धिक, सामाजिक, नैतिक विकास आणि आत्मसन्मान देणारे होते, असे प्रतिपादन डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांनी आज केले. 

शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्यावतीने सुरु असलेल्या फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी स्वागत व प्रास्ताविक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी केले. यावेळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील उपस्थित होते. 

डॉ. मिरजकर म्हणाले, बौद्धिक स्तरावर कोणीही श्रेष्ठ अथवा कनिष्ठ नाही. त्यामुळे सर्वांना शिक्षण घेण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. त्यासाठी हंटर कमिशन पुढे साक्ष देताना ब्रिटीश सरकारने प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले पाहिजे, बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे, अशी मागणी निवेदनाद्वारे महात्मा फुले यांनी केली. बहुजन समाजातील विद्यार्थांना शिकविण्यासाठी त्याच समाजातील शिक्षकांची नेमणूक केली जावी. सरकार बहुजन समाजातील शेतकऱ्यांकडून शेतसारा घेते परंतु त्यांच्या, मुलांना शिक्षण देत नाही हे चुकीचे आहे तर त्यांनासुद्धा शिक्षण मिळाले पाहिजे. महात्मा फुले यांनी सर्व वर्गातील स्त्रिया, शूद्र व अतिशूद्र समाजातील विद्यार्थांना शिक्षण देण्यासाठी शाळा सुरु केल्या. महात्मा फुले कृतीशील व वैचारिक समाजसुधारक होते. 

शिवाजी विद्यापीठाच्या शिववार्ता या युट्युब वाहिनीवरून प्रसारण करण्यात आले. विद्यापीठाच्या जनसंपर्क कक्षाद्वारे याचे संयोजन करण्यात आले. शिक्षक, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.

महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत आज सकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, डॉ. तृप्ती करेकट्टी, डॉ. कैलास सोनवणे, डॉ. प्रभंजन माने, डॉ. मच्छिंद्र गोफणे, डॉ. ए. बी. कोळेकर यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.