महालक्ष्मी मंदिर परिसरासाठी 1447 कोटींचा आराखडा मंजूर
श्री महालक्ष्मी मंदिर विकास प्राधिकरणांतर्गत करण्यात आलेल्या १४४७ कोटींच्या आराखड्याला जिल्हास्तरीय समितीकडून मंजुरी मिळाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात पुनर्विकास आराखडा समितीची बैठक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत श्री महालक्ष्मी परिसराच्या पुनर्विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. यानंतर आराखडा मंजूर करण्यात आला व पुढील मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्याचे ठरले.
श्री महालक्ष्मी मंदिर परिसराच्या विकासासाठी बनविलेल्या २५५ कोटींच्या आराखड्याअंतर्गत ४५ कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. या निधीतून दर्शन मंडप, पार्किंगची व इतर कामे करण्यात येणार आहेत. या दोन्ही आराखड्यांचे प्रस्तावामध्ये एकच काम दोन्ही आराखड्यात असल्याने एका आराखड्यातून ते काम व त्याची रक्कम वगळण्यात यावी, अशी सूचना शासनाने केली आहे. ही कामे वगळून सुधारित आराखड्याला जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.