मातोश्रीवर के. पी. पाटलांचा प्रक्ष प्रवेश: राधानगरीत नव्या राजकीय चुरशीची सुरुवात

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राधानगरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी ठाम असलेल्या बिद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि माजी आमदार के. पी. पाटील यांनी पुन्हा पक्षांतर करताना ठाकरे गटाची मशाल हाती घेतली आहे. आज (23 ऑक्टोबर) के. पी. पाटील यांचा मातोश्रीवर पक्षप्रवेश झाला असून, त्यामुळे राधानगरीत प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या वतीने ते मैदानात उतरणार असल्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून के. पी. पाटील आणि त्यांचे मेहुणे ए. वाय. पाटील यांच्यात विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी चुरस सुरू होती. दोघेही महाविकास आघाडीकडून इच्छुक होते, मात्र आता के. पी. पाटील यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर ए. वाय. पाटील कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. लोकसभा निवडणुकीत राधानगरीतून शाहू महाराजांना मोठं मताधिक्य मिळाल्यानंतर पाटील कुटुंबात या उमेदवारीसाठी संघर्ष वाढला होता.