'त्यांना' इंग्रजी येत नाही म्हणून हिंदी लादू नका : संजय राऊत

मुंबई : “मोदी आणि शाहांना इंग्रजी येत नाही म्हणून हिंदी लादू नका. हे त्यांच्या सोयीसाठी इतर भाषांवर सूड उगवण्यासारखं आहे. हे चुकीचं आहे,” असं मत व्यक्त करत खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.
राज्य सरकारने नव्या शैक्षणिक वर्षापासून पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याचा घेतलेला निर्णय शिक्षण आणि राजकीय क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया निर्माण करत आहे. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसह राज्य अभ्यासक्रमात हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय जाहीर होताच विविध संघटना, शिक्षणतज्ज्ञ आणि राजकीय नेते सरकारवर तुटून पडले आहेत.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तिच्या प्रचारासाठी प्रयत्न होणे अपेक्षित असताना सरकार हिंदीचा आग्रह का धरते आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत भाषायुद्धाचा इशारा दिला आहे, तर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सरकारवर थेट टीका केली आहे.
राऊत म्हणाले, “भाजपने कधीच मराठीच्या बाजूने ठामपणे आवाज उठवलेला नाही. महाराष्ट्राच्या निर्मितीपासून, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनापासून ते आजच्या बेळगाव सीमाप्रश्नापर्यंत भाजपचे नेतृत्व मौन बाळगते. मराठी भाषेवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात त्यांचा आवाज ऐकू येत नाही.”
मुंबईसारख्या शहरात हिंदी सिनेसृष्टीचे बळ असतानाही विद्यार्थ्यांवर हिंदी सक्ती लादणं अन्यायकारक असल्याचेही राऊत म्हणाले. “महाराष्ट्रात आधी मराठी भाषा सक्तीची करा. शाळा, नोकऱ्या आणि व्यवहारात मराठीला प्राधान्य द्या. अभ्यासक्रमावर हिंदी थोपवणं म्हणजे विद्यार्थ्यांवर अन्याय आहे.”
“हिंदी सक्ती मागे निवडणुकीसाठीचं राजकारण आहे. ही संपूर्ण योजना आगामी महापालिका निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेली ‘पडद्यामागची नाट्यमीमांसा’ आहे.” अशी टिकाही राऊत यांनी केली आहे.