मुंबई लोकलमध्ये महिलांमध्ये तुफान हाणामारी ; डोंबिवली लोकलमधील व्हिडिओ व्हायरल

मुंबई लोकलमध्ये महिलांमध्ये तुफान हाणामारी ; डोंबिवली लोकलमधील व्हिडिओ व्हायरल

मुंबई - मुंबई लोकलमधील महिला डब्यांमध्ये प्रवाशांमध्ये होणारा वाद आणि हाणामाऱ्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. आज सकाळी डोंबिवलीहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये सकाळी ८:२० वाजता महिलांमध्ये जोरदार झटापट झाली. जागेच्या वादातून सुरू झालेला वाद थेट तुफान हाणामारीत बदलला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये काही महिला एकमेकींना ढकलताना, शिवीगाळ करताना आणि केस ओढून मारहाण करताना स्पष्टपणे दिसत आहेत. काही प्रवाशांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यश आलं नाही.

https://x.com/harish_malusare/status/1939943508632088891?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1939943508632088891%7Ctwgr%5Ef50d026e24c0bdaf3e250eab5d9c18fc4709b181%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.indiatimes.com%2Fmaharashtra%2Fmumbai-news%2Fmumbai-news-fight-between-women-in-dombivli-to-csmt-local-train-video-goes-viral%2Farticleshow%2F122175501.cms

हाच प्रकार काही दिवसांपूर्वी विरार लोकलमध्येही घडला होता. काही दिवसांपूर्वी १७ जून रोजी सायंकाळी ७:३० वाजता मिरारोड ते भाईंदर दरम्यान विरार लोकलमध्येही जागेच्या वादातून दोन महिलांमध्ये मारामारी झाली होती. त्या वेळी महिलांमध्ये इतकी जोरात झटापट झाली की एका प्रवासी महिलेला रक्तस्राव होईपर्यंत मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता आणि नंतर भाईंदर स्थानकात पोलिसांनी हस्तक्षेप करत दोघींनाही ताब्यात घेतले होते.

महिला डब्यांतील वाढते वाद – सुरक्षेचा गंभीर प्रश्न

गर्दीच्या वेळेत लोकलच्या महिला डब्यांमध्ये जागेवरून होणारे वाद हाणामाऱ्यांमध्ये रूपांतरित होत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. या घटनांमुळे अन्य प्रवाशांचेही हाल होत असून, महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे.

प्रवाशांचे म्हणणे आहे की, रेल्वे प्रशासनाने या घटना गांभीर्याने घेत तातडीने उपाययोजना करायला हव्यात. सुरक्षा रक्षकांची उपस्थिती वाढवावी आणि महिलांमध्ये जागरूकतेसाठी विशेष मोहीम राबवावी. मुंबई लोकल ही शहराची जीवनवाहिनी मानली जाते, पण अशा घटनांमुळे लोकांची प्रवासावरील विश्वासार्हता डगमगू लागली आहे. महिला डब्यांतील सुरक्षितता आणि नियंत्रणासाठी तातडीचे उपाय हे आता वेळेची गरज ठरत आहेत.