मुंबईसह ठाण्यात लवकरच केबल टॅक्सी सुरू होणार
मुंबई : मुंबईसह ठाण्यात लवकरच केबल टॅक्सी सुरू होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर केबल टॅक्सीचे संकेत दिले आहेत. मंत्री सरनाईक यांनी मुंबई आणि ठाणे या दोन्ही शहरातील नागरिकांना वाहतूककोंडीतून मुक्त करण्यासाठी सर्व पर्याय शोधले जातील, असं सांगितलं. या पर्यायांमध्ये केबल टॅक्सीचाही समावेश असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. ते या प्रजेक्टकडे ड्रीम प्रोजेक्ट म्हणून पाहत आहेत.
सध्या महाराष्ट्रात कुठेही केबल टॅक्सी नाही. प्रताप सरनाईक यांनी सांगितलं, की आपण १५ किंवा २० सीटर केबल टॅक्सी चालवली, तर आपल्याला ट्रॅफिकपासून मुक्तता मिळू शकते. जर आपण मेट्रो चालवू शकतो, तर केबल टॅक्सी चालवण्यास कोणतीही समस्या नाही. केबल टॅक्सीसाठी रोप वे बनवण्यासाठी अधिक जमीनीची गरज लागणार नाही.
सरनाईक यांनी असंही सांगितलं, की महाराष्ट्र परिवहन विभागाच्या अंतर्गत केबल टॅक्सी चालवल्या जाणार आहेत, त्यामुळे ही यंत्रणा व्यवस्थित चालेल. केबल टॅक्सी वीज आणि सोलरवर चालतात. हे वाहतुकीचे अतिशय उत्तम आणि पर्यावरणपूरक साधन आहे.