राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी सांगता व कृतज्ञता पर्व-2023 चे उद्घाटन

राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी सांगता व कृतज्ञता पर्व-2023 चे उद्घाटन

कोल्हापूर प्रतिनिधी मुबारक आत्तार 

शाहू महाराजांना अभिप्रेत असणारे कोल्हापूर निर्माण होण्यासाठी प्प्रयत्न -पालकमंत्री दीपक केसरकर

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिप्रेत असलेले सर्वांगिण विकासाने परिपूर्ण कोल्हापूर निर्माण होण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही देऊन येत्या वर्षभरात कोल्हापूरची विकासकामे मार्गी लावण्यात येतील, असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

छत्रपती शाहू मिल येथे आयोजित लोकराजा राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी सांगता समारंभ, कृतज्ञता पर्व-2023 चे उद्घाटन पालकमंत्री श्री. केसरकर यांच्या करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती उपस्थित होते. याप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार सर्वश्री जयंत आसगावकर, प्रकाश आवाडे, राजेश पाटील, ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

याठिकाणी आयोजित आंबा महोत्सवाचे उद्घाटन श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. तर शिवकालीन शस्त्रास्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या विविध प्रदर्शनांना उपस्थित सर्व मान्यवरांनी भेट देऊन पाहणी केली.

पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, समाजसुधारणेचा महामेरु म्हणून ओळख असणाऱ्या शाहू महाराजांनी समाज सुधारणेसाठी मोलाचे काम केले आहे. कोल्हापूर संस्थानात स्त्री सबलीकरणासाठी महत्वपूर्ण निर्णय घेऊन त्या धोरणांची त्यांनी अंमलबजावणी केली. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती, शिक्षकांना खास इनाम जाहिर केले. शिक्षणाला चालना देण्यासाठी सक्तीचे शिक्षण सुरु केले. विविध व्यापारपेठा निर्माण करुन उद्योगनगरी म्हणून कोल्हापूरची ओळख ही शाहू महाराजांमुळेच सर्वदूर पोहचली आहे. शाहू महाराजांनी केलेले कार्य समाजाला दिशादर्शक असून त्यांनी निर्माण केलेल्या शाहू मिलसह कोटीतीर्थ तलाव परिसरातील विकासाची कामे लवकरात लवकर सुरु होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, समाजाच्या कल्याणासाठी जीवन व्यतीत करणाऱ्या शाहू महाराजांचे समाजावर मोठे उपकार आहेत. जुन्या अनिष्ट चालीरिती संपुष्टात आणण्याचे क्रांतिकारी कार्य त्यांनी केले. सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करुन समाजाला शिक्षीत करण्याचे काम शाहू राजांनी केले. विधवा पुनर्विवाहाच्या कायद्यासह अनेक कायदे करुन सामाजिक समता निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शाहू राजांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 14 मे पर्यंत शाहू मिल मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून येथील सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी उपस्थित राहून शाहू महाराजांच्या विचारांचा जागर करावा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करुया, असे आवाहन करुन शाहू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या शाहू स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरु व्हावे, अशी अपेक्षा श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी अध्यक्षस्थानी बोलताना व्यक्त केली.

जिल्ह्यात तयार होणाऱ्या विविध उत्पादनांना चालना देण्यासाठी तसेच त्यांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी शाहू मिल येथे वस्तू व विविध उत्पादनांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. यामध्ये गूळ, कापड, चप्पल, माती व बांबूच्या वस्तु, खाद्य पदार्थ, तांदूळ, मिरची, मध, काजू, तृणधान्य व वन उत्पादने आणि आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला नागरीकांनी भेट द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी प्रास्ताविकेमध्ये केले. आभार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी मानले.