पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत सहभागासाठी 30 जून पर्यंत मुदतवाढ

कोल्हापूर (प्रतिनिधी) - प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना मृग बहार 2025 मधील पेरु, द्राक्ष व लिंबू या पिकांसाठी विमा सहभागाची अंतिम मुदत 30 जून पर्यंत वाढवण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत मृग व आंबिया बहारमध्ये विमा संरक्षण देण्यात येते. मृग बहारासाठी शेतकऱ्यांना यापूर्वी अंतिम मुदत 14 जून निर्धारित करण्यात आली होती. मात्र, पिक विमा पोर्टल www.pmfby.gov.in 13 जून रोजीच सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज भरण्यासाठी फारच कमी वेळ उपलब्ध झाला होता. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सुलभतेने विमा योजनेंतर्गत सहभाग नोंदवता यावा यासाठी अंतिम मुदत 30 जून पर्यंत वाढवण्यात आली आहे.
पेरु, द्राक्ष व लिंबू उत्पादक शेतकऱ्यांनी ही संधी न गमावता आपल्या पिकांचे विमा संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय कृषी सह संचालकांनी केले आहे.