राजाभाऊंच्या अचानक झालेल्या एक्झिटने समरजितराजे झाले भावनाविवश

राजाभाऊंच्या अचानक झालेल्या एक्झिटने समरजितराजे झाले भावनाविवश

*माळी कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करत दिला आधार*

सेनापती कापशी प्रतिनिधी  : येथील युवा उद्योजक सामाजिक कार्यकर्ते व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांचे चिकोत्रा खोऱ्यातील खंदे समर्थक राजाभाऊ माळी यांचे अल्पशा आजाराने शनिवारी रात्री निधन झाले.कापशी खो-यातील अनेक तरुणांचा आधारस्तंभ असलेल्या राजाभाऊंच्या अचानक झालेल्या एक्झिटने त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनवेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे भावनाविवश झाले. त्यांच्यासह उपस्थितांचे डोळे पाणावले व सर्वच जण काही वेळ निशब्द झाले.

माळी हे या परिसरातील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते म्हणून सर्वपरिचित होते. विविध समाजकार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. तसेच घाटगे यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून कार्यरत होते. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी कापशी परिसरातून घाटगे यांना जास्तीत जास्त मते मिळवून देण्यासाठी आजारी असतानाही त्याची पर्वा न करता उपचार सुरु असताना दवाखान्यातून प्रयत्न केले होते. तरीही राजेंच्या निसटता पराभव झाल्यामुळे याची खंत त्यांनी बोलूनही दाखवली होती. गतवेळी कापशी ग्रामपंचायत मध्ये घाटगे गटाची सत्ता आणण्यामध्ये उमेश देसाई दत्तोपंत वालावलकर यांच्याबरोबर त्यांचा सिंहाचा वाटा होता.घाटगे यांनी ते आजारी असताना वेळोवेळी त्यांच्या तब्येतीची आस्थेवाईकपणे विचारपूस करत काळजी घेणे बाबत त्यांना सांगितले होते.शनिवारी रात्री माळी यांचे निधन झाल्यानंतर पहाटे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या नातेवाईकांसह मोठा मित्रपरिवार आपल्या या लाडक्या मित्रास निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. घाटगे यांनीही सकाळी कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले व त्यांना आधार दिला. माळी यांची उणीव नेहमीच भासत राहील.त्यांच्या अकाली निधनाने केवळ त्यांच्या कुटुंबीयांचे नव्हे तर कापशी परिसरासह राजे गटाचे न भरून येणारे नुकसान झाल्याच्या भावना घाटगे यांनी व्यक्त केल्या.