राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांत कोल्हापूरच्या ‘गाभ’ला तीन नामांकने

राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांत कोल्हापूरच्या ‘गाभ’ला तीन नामांकने

कोल्हापूर : येथील निर्माते मंगेश गोटुरे यांच्या ‘गाभ’ या चित्रपटाला साठाव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटासह तीन विभागांत नामांकने मिळाली आहेत. महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी (दि. २८) रोजी या पुरस्कारांची घोषणा केली.

साठाव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या अंतिम फेरीसाठी ‘गाभ’ चित्रपटाची निवड झाली आहे. अनन्या, पाँडिचेरी, सनी, धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे, ४ ब्लाईंड मेन, समायरा, ह्या गोष्टीला नावच नाही, ग्लोबल आडगाव, हर हर महादेव या चित्रपटांच्या बरोबरीने ‘गाभ’ला अंतिम फेरीत नामांकन प्राप्त झाले आहे. 

‘गाभ’ चित्रपटासाठी लेखक-दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांना ‘उत्कृष्ट प्रथम पदार्पण: दिग्दर्शन’ या विभागात अंकुश चौधरी (४ ब्लाईंड मेन) आणि प्रताप फड (अनन्या) यांच्या बरोबरीने नामांकन मिळाले आहे. तर, अभिनेत्री सायली बांदकर यांना ‘उत्कृष्ट प्रथम पदार्पण: अभिनेत्री’ या विभागात अभिनेत्री हृता दुर्गुळे (अनन्या) आणि मानसी भवाळकर (सोयरिक) यांच्यासह नामांकन मिळाले आहे.