वन नेशन वन रेशन आणि डिजिटल रेशनकार्ड या संकल्पनेस धक्का?
कोल्हापूर (प्रतिनिधी) :आयुष्यमान भारत योजना नवीन घोषित निर्णयाप्रमाणे केशरी व शुभ्र शिधापत्रिका धारकांना ५ लाखापर्यंत मोफत औषध उपचार मिळणे कारणी शहर पुरवठा कार्यालयातून बारा अंकी नंबर मिळणे बाबत दिरंगाई होत आहे. कोल्हापूर शहरामध्ये शुभ्र रेशन धारकांची संख्या ३४,१०३, केसरी रेशन धारक ७६,९७८ प्राधान्य ७०,५५० आणि अंत्योदय ३०७३ इतकी आहे. त्यापैकी प्राधान्य रेशनधारकांना २ किलो गहू ३ किलो तांदूळ आणि अंत्योदय धारकांना ३५ किलो तांदूळ व गहू दरमहा मिळते. अंत्योदय व केसरी रेशन धारकांसोबत शुभ्र रेशनधारकांना 5 लाख पर्यंत या योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु 12 अंकी नंबर लवकर मिळत नसल्याने अनेक नागरिक या योजनेवासून वंचित आहेत.
याविषयात आज भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली भाजपा शिष्ठमंडळाने जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांना निवेदन सादर दिले. यावेळी शहर पुरवठा अधिकारी नितीन धापसे-पाटील उपस्थित होते. जिल्हा पुरवठा कार्यालयातील कामासंबधित नागरिकांच्या अनेक तक्रारी येत असल्याने जिल्हाध्यक्ष यांनी नाराजी व्यक्त केली.
याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, RCMC PORTAL मध्ये नोंदणी केली असता शहर पुरवठा कार्यालयात नोंद होते. तेथे तीन ठिकाणी मान्यता मिळाल्यानंतर बारा अंकी नंबर मिळतो. परंतु पोर्टल, ई सेवा केंद्र येथे अर्ज करून अनेक महिने उलटून सुद्धा या कार्यालयाकडून सर्व सामान्य जनतेची अडवणूक केली जात आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वन नेशन वन रेशन आणि डिजिटल रेशनकार्ड ह्या संकल्पनेस धक्का पोहचु नये याची दक्षता घेण्यात यावी अशी सूचना करण्यात आली
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये, विजयसिंह खाडे-पाटील, रोहित पवार यांनी सदर विभागातील अधिकाऱ्यांना कामात सुधारणा करून त्यांच्याकडील कामे त्वरित निर्गमित करणे बाबत सूचित करण्यात आले. लवकरात लवकर डिजिटल रेशनकार्ड उपलब्ध करून द्यावीत. सर्व सामान्य नागरिकांना आयुष्मान भारत व अन्य शासकीय योजनांचा लाभ घेता येईल. अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली .
याप्रसंगी डॉ. सदानंद राजवर्धन, गायत्री राऊत, हेमंत आराध्ये, शैलेश पाटील, विराज चिखलीकर, विजयसिंग खाडे-पाटील, चंद्रकांत घाटगे, आशिष कपडेकर, रोहित पोवार, रमेश दिवेकर, संगीता खाडे, अभिजित शिंदे, महेश यादव, प्रग्नेश हमलाई, डॉ. शिवानंद पाटील, रविकिरण गवळी, कोमल देसाई आदी उपस्थित होते.