शिवसेना महिला आघाडीचे ट्रॅफिक पोलिसांना राखी बांधून रक्षाबंधन

शिवसेना महिला आघाडीचे ट्रॅफिक पोलिसांना राखी बांधून रक्षाबंधन

कोल्हापूर (प्रतिनिधी) - नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी चोवीस तास कर्तव्य पार पाडत असलेल्या पोलिसांना सण उत्सव साजरे करायला मिळत नाहीत. रक्षाबंधन ही त्याला अपवाद नाही. त्यामुळे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सोमवारी कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या (ट्रॅफिक ब्रॅंच) पोलिसांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे यांनी हा उपक्रम राबवला.

नागरिकांनी सण-उत्सव उत्साहात आणि सुरक्षित साजरे करावेत यासाठी पोलीस रात्रंदिवस रस्त्यावर असतात. त्यामुळे पोलिसांना सणासुदीच्या कालावधीत सुट्टी नसते. ड्युटीची जबाबदारी असल्याने बहुतांश पोलिसांना रक्षाबंधन साजरा करता येत नाही. एकीकडे अवघ्या शहरात रक्षाबंधनाच्या उत्सव सुरू असताना दुसरीकडे राखी न बांधताच पोलीस आपले कर्तव्य पार पाडत होते. त्या सर्व पोलीस अधिकारी आणि कॉन्स्टेबल यांना प्रतिज्ञा उत्तुरे यांच्यासह शिवसेनेच्या महिलांनी राखी बांधून ओवाळले. शिवसेना महिला आघाडीने बांधलेल्या राख्यांमुळे पोलीसही गहिवरले. या उपक्रमाबद्दल पोलिसांनी शिवसेनेच्या महिलांना आशीर्वाद दिले.

यावेळी शहर संघटिका रीमा देशपांडे, शुभांगी साळुंखे, तेजश्री पाटील, अनिता ठोंबरे आधीसह शिवसेना महिला आघाडीच्या सदस्य उपस्थित होत्या.