वाकीघोल परिसर केपींच्या पाठीशी ठाम;*आबिटकरांविरोधात हा परिसर निर्णायक भूमिका घेईल : देसाई,भाटळे यांचे प्रतिपादन

वाकीघोल परिसर केपींच्या पाठीशी ठाम;*आबिटकरांविरोधात हा परिसर निर्णायक भूमिका घेईल : देसाई,भाटळे यांचे प्रतिपादन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील डोंगर- दर्‍यांचा परिसर अशी ओळख असलेल्या वाकीघोल पंचक्रोशितील अनेक गावे व वाड्या या निवडणुकीत माजी आमदार के पी पाटील यांच्या पाठीशी ठाम राहतील,असा विश्वास बिद्री साखर कारखान्याचे संचालक राहुल देसाई यांनी व्यक्त केला,तर हा परिसर समस्याग्रस्त व दुर्लक्षित ठेवणाऱ्या आमदार आबिटकरांच्या पराभवासाठी निर्णायक भूमिका घेईल असे प्रतिपादन दुसरे संचालक राजेंद्र भाटळे यांनी केले.

वाकीघोल परिसरातील चाफोडी,सावर्दे या गावांमध्ये प्रचारासाठी झालेल्या सभांमध्ये ते बोलत होते.

राहुल देसाई पुढे म्हणाले,"देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून राधानगरी तालुक्यातील काही आडवळणी गावांमध्ये आजही फार मोठ्या समस्या आहेत. आमदार आबिटकर आमदार होण्यापूर्वी आधीच्या लोकप्रतिनिधींनी उपलब्ध निधीनुसार काही विकासकामे जरूर केली आहेत. परंतु गेल्या दहा वर्षांत मात्र विद्यमान आमदारांकडून परिसरात अपेक्षित अशी विकासाची कामे झाली नाहीत. भौगोलिक दृष्ट्या हा परिसर अत्यंत अडचणीचा असल्यामुळे आमदारांनी तो विकसित करण्यासाठी प्राधान्य द्यायला हवे होते; परंतु त्यांच्याकडून तसा प्रयत्न झाला नसल्याने येथील जनता त्यांच्या कामाच्या बाबतीत समाधानी नाही."

राजेंद्र भाटळे म्हणाले,"आमदार आबिटकरांनी आधीच समस्याग्रस्त असलेल्या या परिसराकडे दुर्लक्ष केल्याने समस्या वाढतच राहिल्या. जिथे विकासकामे केली ती दर्जेदार झाली नसल्यामुळे 'असून अडचण आणि नसून खोळंबा' अशी कामांची स्थिती झाली आहे. त्यामुळे या परिसरातील जनभावना ही आमदार आबिटकरांच्या विरोधात असून या निवडणुकीत त्यांचा पराभव करण्यासाठी हा परिसर महत्त्वाची भूमिका निभावेल."

यावेळी माजी आमदार के पी पाटील,धोंडीराम मगदूम,पंडितराव केणे, राणी डिसोझा आदींची भाषणे झाली. या प्रचार दौऱ्यामध्ये सचिन घोरपडे, सुनील कांबळे,संग्राम देसाई,महेंद्र देसाई,संदीप पाटील,बाळू कामते, शिवाजी डोंगरे,दशरथ पाटील,शरद वैराट,संजय सरदेसाई आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*विकासकामासाठी सोन्याच्या सळ्या वापरल्या काय ?* 

के पी पाटील आपल्या भाषणात म्हणाले,"विद्यमान आमदार जिकडे जाईल तिकडे विकासनिधी विकासनिधी असेच सांगत सुटले आहेत. त्यांचे निधी,पैसा या शब्दांवर फार प्रेम आहे. या परिसरात जी काही कामे दिसतात त्यांचा दर्जा काय हे मी सांगायची गरज नाही; मात्र त्यावर खर्च झालेला आकडा ऐकला की यांनी विकासकामांसाठी लोखंडी सळ्या वापरण्याऐवजी सोन्याच्या सळ्या वापरल्या काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. केवळ भागीदारी, टक्केवारीमुळे विकास कामांचे आकडे फुगवून सांगणाऱ्या या आमदारांना पराभूत करा."