वेगाचा कहर: कोल्हापूरच्या उद्योजक पुत्राचा आंबोली मार्गावर अपघाती मृत्यू

कोल्हापूर : आजरा-आंबोली महामार्गावर देवर्डे-मुदाळ तिट्टा दरम्यान रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात कोल्हापूरमधील उद्योजकाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सिद्धेश विलास रेडेकर (वय २३, रा. माळी कॉलनी, टाकळा, कोल्हापूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याजवळ १२ लाख रुपये किंमतीची स्पोर्ट्स बाईक आणि डोक्यावर ७० हजार रुपयांचे अत्याधुनिक हेल्मेट असूनही, अपघात इतका भीषण होता की त्याचा जीव वाचवता आला नाही.
सिद्धेश हा कोल्हापुरात आर्किटेक्चरचे शिक्षण घेत होता आणि ‘सिद्धार्थ बायकर्स’ या ग्रुपचा सदस्य होता. त्याला बाईक राईड्स आणि फोटोग्राफीची विशेष आवड होती. रविवारी सकाळी तो आपल्या चार मित्रांसह आंबोलीकडे फेरफटका मारण्यासाठी गेला होता. सकाळी सहाच्या सुमारास त्यांनी कोल्हापुरातून बाईक राईड सुरू केली होती आणि घाटातील ठिकाणी फोटोसेशनही केले होते.
मात्र, सकाळी ११ च्या सुमारास परत कोल्हापूरकडे येताना एका तीव्र वळणावर सावंतवाडीकडे येणाऱ्या तवेरा गाडीला सिद्धेशच्या बाईकची समोरून जोरदार धडक बसली. धडक इतकी तीव्र होती की त्याचे हेल्मेट फुटून रस्त्याच्या कडेला उडून गेले, आणि बाईकचा अक्षरशः चक्काचूर झाला. डोक्याला, छातीला आणि हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्याला गडहिंग्लजमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याने प्राण सोडले.
विशेष म्हणजे, अत्याधुनिक हेल्मेट असूनही त्याचे तुकडे झाले होते. या हेल्मेटमध्ये कॅमेरा देखील होता, त्यामुळे अपघाताची अधिक माहिती कॅमेराद्वारे मिळण्याची शक्यता आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार बाईकचा अतिवेग हा अपघाताचे मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे.
सिद्धेश हा घरचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या वडिलांचा कोल्हापुरात मोठा जनसंपर्क असल्यामुळे अपघाताची बातमी समजताच सीपीआर रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.