उद्धव -राज एकत्र येणार ? चर्चांना पुन्हा उधाण

उद्धव -राज एकत्र येणार ? चर्चांना पुन्हा उधाण

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना  आणि उद्धव ठाकरे गटाला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं.  निवडणुकीत ठाकरे गटाचे सर्वात कमी जागा मिळाल्या तर  मनसेला या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही. विशेष म्हणजे, राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनाही विजय मिळवता आला नाही. अशातच ठाकरे बंधुंच्या हितचिंतकांची, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची मागणी जोर धरत आहे. 

काही दिवसांपूर्वी शिवसेना भवनासमोर काही लोकांनी दोन्ही भावांना एकत्र येण्याचे आवाहन करणारे बॅनरही लावले होते. परंतु, त्यांना दोन्ही भावांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तरीही रविवारी रात्री मात्र ठाकरे बंधू समर्थकांसाठी एक सुखद चित्र पाहायला मिळाले.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र  दिसले. यावेळी दोघेही बोलत आणि हसत देखील होते. एका लग्न समारंभावेळी हे ठाकरे बंधु एकत्र आले होते. मुंबईतील अंधेरी येथे झालेल्या सरकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे उपस्थित होते. उद्धव यांच्यासोबत त्यांची पत्नी रश्मी ठाकरे  आणि राज यांच्यासोबत त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे  होत्या. उद्धव, रश्मी ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात चांगली चर्चा झाली. त्यांच्या भेटीनंतर मात्र आता चर्चांना उधाण आले आहे. हे दोन्ही भाऊ आता मराठी माणसांसाठी एकत्र येतील का? असा प्रश्न सर्वांनाच पडत आहे.

पराभवानंतर दोन्ही बंधूंच्या एकतेचे बॅनर 

विधानसभा निवडणुकीच्या  पराभवानंतर पुण्यापासून मुंबईपर्यंत राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकतेचे बॅनर लावण्यात आले. ठाकरे बंधूंना एकत्र येण्यास प्रोत्साहित करण्यासाठी सर्वप्रथम पुण्यात बॅनर लावण्यात आले. यानंतर, मुंबईतील शिवसेना भवनावर बॅनर लावण्यात आले. त्याच वेळी, मनसे नेते बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांनी दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यात त्यांना यश आले नाही.