शहांच्या त्या वक्तव्याने विरोधक आक्रमक
नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी वक्तव्याबद्दल विरोधक आक्रमक झाले आहेत. ''अभी एक फॅशन हो गया है.... आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर. इतकं नाव देवाचं घेतलं असलं तर सात जन्म स्वर्गात गेले असते.'' असं वक्तव्य अमित शाह यांनी लोकसभेत बोलताना केलं होतं. राज्यसभेतील त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद विधानसभेतहि उमटले. काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी शाहांच्या या वक्तव्याचा विधानसभेत निषेध केला आहे.
राऊत म्हणाले, 'बाबासाहेबांचं नाव घेण्याचा इतका द्वेष का आहे, हा केवळ बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान नाही तर, अख्ख्या देशाचा अपमान आहे. संविधानाला मानणाऱ्या सर्व समाजाचा, दलित समाजाचा अपमान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माते आहेतच, पण याचबरोबर आमच्यासाठी एक मार्गदाता, भाग्यविधाता आणि ईश्वरदेखील आहेत. परमेश्वर देखील ते आहेत. त्यामुळे त्यांचा असा अपमान आम्ही सहन करू शकत नाही
'हे सभागृह संविधानाने बनलेलं सभागृह आहे आणि या सभागृहामध्ये संविधानावर जे काही म्हटलं जात असेल किंवा संविधान निर्मात्यावर बोललं जात असेल, तर त्याबाबत म्हणणं मांडण्याचा आम्हाला संपूर्ण अधिकार आहे. या देशाला संविधान काँग्रेस पक्षाने दिलं हे विसरता कामा नये', असंही नितीन राऊत म्हणाले.