शरद पवारांचे चित्रपटसृष्टीत असेही योगदान, 'सिंहासना'साठी धावले मदतीला

शरद पवारांचे चित्रपटसृष्टीत असेही योगदान, 'सिंहासना'साठी धावले मदतीला

मुंबई: आज शरद पवार यांचा वाढदिवस. राजकीय क्षेत्रात शरद पवारांना जितके मानले जाते तितकेच त्यांना चित्रपटसृष्टीतील लोकही आपले मानतात. सिनेइंडस्ट्रीतल्या कलाकरांसोबतही त्यांची खास मैत्री आहे. शरद पवार यांनी  चित्रपटांसाठी वेळोवेळी मदत केली आहे.  अगदी 'सिंहासन' चित्रपट असो किंवा मग काही वर्षांपूर्वी आलेला आयकॉनिक सिनेमा 'झपाटलेला'.या चित्रपटांना मदतीचा हात त्यावेळी शरद पवार यांनी दिला होता. 

जब्बार पटेल यांनी सांगितला सिंहासन सिनेमातला खास किस्सा...

१९७९ मध्ये आलेल्या सिंहासन या चित्रपटाला पार्श्वभूमी होती. सिनेमात डॉ. श्रीराम लागू, अरुण सरनाईक, निळू फुले, नाना पाटेकर यांच्यासारखे दिग्गज अभिनेते होते.डॉ. जब्बार पटेल या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. त्यांनीच शरद पवारांचा हा किस्सा सांगितला. या काळात शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.

जब्बार पटेलांना सिनेमासाठी 'विधानभवन आणि मंत्र्यांच्या बंगल्यांचं शूटिंग करायचं होतं. याची परवानगी सहज मिळणं शक्य नव्हतं. त्यावेळी राज्यात निवडणुकीचं वातावरणही होतं. जब्बार पटेलांनी शरद पवार यांच्या मुख्य सचिवांनी परवानगी मिळणार नाही, असं सांगितलेलं.पण नंतर शरद पवारांनी शूटिंगला परवानगी दिली होती. त्यामुळं सिनेमाचं शूटिंग खऱ्या लोकेशनवर करण्यात आल्याची खास आठवण जब्बार पटेल यांनी सांगितलेली. तर परवानगी देण्याबद्दल नंतर पवार म्हणाले होते की, मुख्यमंत्री कार्यालय शूटिंगसाठी उपलब्ध करून देणं अयोग्य असल्याची मोठी नोट सामान्य प्रशासन विभागानं पाठवली होती. नोट ओव्हररूल करण्यात माझा हातखंडा असल्यानं तसं करू शकलो, पण त्यातून अप्रतिम कलाकृती निर्माण झाली.

महेश कोठारेंची आठवण ,शरद पवारांमुळे 'तात्या विंचू'थेट लंडनला 

१९९३मध्ये आलेल्या 'झपाटलेला'या चित्रपटाशीही शरद पवार यांचं खास कनेक्शन आहे. मराठी सिनेमा आता परदेशात प्रदर्शित होत असला तरी, त्या काळात ही खूप मोठी गोष्ट होती. निर्माते महेश कोठारेंनी हा सिनेमा परदेशात प्रदर्शित करायचा ठरवला होता. लंडन इथं प्रिमियर करण्यासाठी पुरेसं आर्थिक पाठबळ नसल्यानं महेश कोठारेंनी त्या वेळचे मुख्यमंत्री शरद पवारांची भेट घेत मदत मागितली होती. दोनच दिवसात त्यांना मुख्यमंत्री कार्यालयातून चेक घेऊन जावा, असा फोन आला होता,अशी खास आठवण कोठारेंनी एका मुलाखतीत सांगितली होती.