शहरातील रोडरोमिओंवर कारवाई करा; भाजप युवा मोर्चाची मागणी

शहरातील रोडरोमिओंवर कारवाई करा; भाजप युवा मोर्चाची मागणी
त्वरित कारवाई न केल्यास अशा रोडरोमिओंना अद्दल घडवू; भाजपा युवा मोर्चाचा इशारा

कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी

शहरातील रोडरोमिओंवर कारवाई करण्याची मागणी कोल्हापूर भाजप युवा मोर्चाच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन भाजप युवा मोर्चाच्यावतीने अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांना आज देण्यात आले. यावेळी जयश्री देसाई यांनी लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्याची ग्वाही दिली.

दोन दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीची छेड काढून त्रास देणाऱ्या एका नशेबाज तरुणांना भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. अशा घटना वारंवार शहरातील कॉलेज, शाळा, बस थांबा येथे घडत असता पण मुली, महिला त्या टोळक्यांना घाबरून त्यांच्या विरोधात तक्रार द्यायला पुढे येत नाहीत, एवढी दहशत या नशेबाज गुंडानी निर्माण केली आहे. ही दहशत मोडून काढावी आणि आपल्या माता-भगिनींना निर्भय होऊन वावरता यावे, तसेच दिल्लीत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती आपल्या शहरामध्ये होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलावीत, निर्भया पथकांची संख्या वाढवावी त्याचबरोबर पोलीस हेल्पलाइनचे नंबर प्रत्येक शाळा, कॉलेज आणि सर्वत्र लावावेत आणि तक्रार येताच त्वरित कारवाई करावी म्हणजे आम्हाला कायदा हातात घ्यावा लागणार नाही असे युवा मोर्चाच्यावतीने सांगण्यात आले आहे. 


यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विजयसिंह खाडे-पाटील, उपाध्यक्ष सुनिल पाटील, अमेय भालकर, वल्लभ देसाई, ओंकार गोसावी, गौरव सातपुते, विश्वजीत पवार, विवेक वोरा यासह कार्यकर्ते उपस्थित होते.